Maharashtra News : राज्य सरकारने राज्यातील नोकरदार महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या महिलांसाठी एक खास योजना सुरू करण्यात येणार आहे. ज्यामुळे नोकरी करून मुलाबाळांचा सांभाळ करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरंतर राज्य सरकारने नोकरी करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पाळणा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या (Aditi Tatkare) मार्गदर्शनात ही योजना सुरू करण्यात येणार आहे. नोकरदार महिलांच्या मुलांच्या संगोपनाची मोठी जबाबदारी आता राज्य सरकार घेणार आहे.
या योजनेत पहिल्या टप्प्यात 345 केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी मिशन शक्ती अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकार निधी उपलब्ध करून देणार आहेत. यात राज्य सरकारचा 40 टक्के तर केंद्र सरकारचा 60 टक्के निधी राहणार आहे. केंद्र सरकाने फेब्रुवारी 2024 रोजी या योजनेस मान्यता देण्यात आली होती. आता राज्य सरकारच्या 13 ऑक्टोबर 2024 रोजीच्या निर्णयानुसार या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजना : सरकार ॲक्शन मोडमध्ये, ‘या’ लोकांकडून वसूल करणार 16 हजार 500 रुपये
या योजनेत नोकरदार मातांचे 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित देखभाल आणि डे केअर सुविधा उपलब्ध राहील. 3 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांसाठी पूर्व उद्दीपन (Stimulation) आणि 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांसाठी पूर्व शालेय शिक्षणाची सोय राहील. या योजनेत मुलांच्या आहाराकडे लक्ष देण्यात येणार आहे.
सकाळचा नाश्ता, दुपारचे भोजन आणि संध्याकाळाचा नाश्ता मुलांना देण्यात येईल. यात दूध, अंडी, केळी असा सकस आहार देण्याचे नियोजन आहे. मुलांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देण्यात येणार आहे. पूरक पोषण आहार, आरोग्य तपासणी, लसीकरण, वाढीचे नियमित निरीक्षण करण्यात येणार आहे. यासाठीची व्यवस्था सरकारकडून करण्यात येणार आहे. वीज, पाणी यांसह अन्य मुलभूत सुविधा डे केअर केंद्रात उपलब्ध राहतील.
महिन्यातील 26 दिवस आणि रोज साडेसात तास पाळणा सुरू राहील.
एका पाळण्यात जास्तीत जास्त 25 मुले ठेवता येतील.
पाळणागृहात प्रशिक्षित सेविका असतील तसेच मदतनीसही असतील.
20 ते 45 वर्षे वय आणि भरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य राहील.
उमेदवारांची निवड जिल्हास्तरीय समितीमार्फत केली जाईल.
पाळणा सेविकेला साडेपाच हजार रुपये, पाळणा मदतनीस तीन हजार रुपये, अंगणवाडी सेविका भत्ता दीड हजार रुपये, 750 रुपये असे मानधन देण्यात येईल अशी माहिती देण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून नोकरदार मातांच्या मुलांना सुरक्षित, शिक्षणाभिमुख आणि पोषणयुक्त वातावरण मिळणार आहे असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजनेत लाभ घेणाऱ्या पुरुषांवर कारवाई होणार? मंत्री तटकरेंचं सूचक वक्तव्य..