Download App

मोठी बातमी! आता ‘छत्रपती संभाजीनगर’, ‘धाराशिव’ जिल्हा; शहरांनंतर जिल्ह्यांचेही नामकरण

Eknath Shinde : छत्रपती संभाजीनगर शहरात आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची मोठी बैठक होत आहे. या बैठकीत मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. या बैठकीआधीच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरानंतर आता दोन्ही जिल्ह्यांचीही नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याचे ‘छत्रपती संभाजीनगर जिल्हा’ आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे ‘धाराशिव जिल्हा’ असे नामकरण झाले आहे. याबाबत राज्य सरकारने शुक्रवारी रात्री राजपत्र जारी केले. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या निर्णयाची घोषणा करणार आहेत.

विरोधकांची तुफान टीका, शिंदेंनी ‘मुक्काम’च बदलला; ‘सुभेदारी’त राहणार CM

राज्य सरकारने याआधी या दोन्ही शहरांची नावे बदलली होती. त्यानंतर आता जिल्ह्यांचीही नावे बदलून टाकली आहेत. राजपत्रही प्रसिद्ध केले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज कॅबिनेट बैठक होत आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे या निर्णयाची घोषणा करतील अशी शक्यता आहे. विशेष म्हणजे, मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारने आलेल्या आक्षेपांची पडताळणी झालेली नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्हा अशी नावे ठेवण्याच ठरलं होतं. त्यानंतर मात्र, सरकारने राजपत्र प्रसिद्ध करत दोन्ही जिल्ह्यांची नावे बदलली आहेत. या निर्णयामुळे आता दोन्ही जिल्हे नवीन नावाने ओळखले जाणार आहेत.

राज्य सरकारने फक्त जिल्ह्यांचेच नाही तर तालुक्यांच्या नावातही बदल केले आहेत. औरंगाबाद तालुक्याचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद तालुक्याचे धाराशिव तसेच औरंगाबाद विभागाचे छत्रपती संभाजीनगर विभाग असे नाव देण्यात आले आहे. या निर्णयानंतर आता काही आक्षेप येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पंडित नेहरूंनी सिगारेटसाठी भोपाळहून इंदौरला विमान पाठवले, मुनगंटीवारांचे पटोलेंना प्रत्युत्तर

..म्हणून शिंदेंनी मुक्काम बदलला

छत्रपती संभाजीनगर येथे आज मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, नेते मंडळींसाठी थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 140 रूम्स आलिशान हॉटेलमध्ये बुक करण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्या अलिशान सुटमध्ये राहणार होते त्याचे भाडे 32 हजार रूपये असून या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून ‘सुभेदारी’ थाट करण्यात आला होता. याशिवाय मंत्री, सचिव आणि इतर अधिकाऱ्यांच्या दिमतीला 300 गाड्यांचा ताफा ठेवण्यात आला होता. राज्यातील नागरिक आणि शेतकरी दुष्काळाच्या संकटाला तोंड देत असताना एका बैठकीसाठी होत असलेला कोट्यावधींचा खर्च पाहून विरोधकांचा पारा चढला. त्यांनी सरकारवर तुफान टीका सुरू केली. मग, सरकारलाही आपलं कुठेतरी चुकतंय, जनतेचा रोषही वाढू शकतो याचा अंदाज आल्याने माघार घेतली. फाइव्ह स्टार हॉटेलात राहण्याचा निर्णयच बदलला.

Tags

follow us

वेब स्टोरीज