Sanjay Raut On CM Fadanvis : बिहारपेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती भयंकर झाली आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. विरोधी पक्षांनी, जनतेने, नागरिकांनी काय करायचं? कुठे जायचं? (Sanjay Raut) काय बोलायचं? हे सगळं अमित शाह, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस ठरवणार का? असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्राला कलंक
परभणी आणि बीडमधल्या घटना या राज्याला कलंक लावणाऱ्या आहेत. इथल्या भयंकर अपराधांशी संबंधित असलेले लोक देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत. मिस्टर फडणवीस बीड आणि परभणी संदर्भात ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे, रोष आहे अशांना तुम्ही मंत्रिमंडळात घेतलं आहे. एकदा जरा बीडला जायला पाहिजे. राहुल गांधी बीड आणि परभणीत गेले. त्यामुळे तुमचं पित्त का खवळलं? असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जायला पाहिजे होतं बीड आणि परभणीमध्ये. तुम्हाला भीती वाटली. राहुल गांधींवर कशाला टीका करता? त्या कुटुंबांचा, माऊलींचा आक्रोश तुमच्या कानांचे पडदे फाडत नसेल तर तुम्ही मुख्यमंत्री म्हणून निर्दयी आहात अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
त्यांचे आभार
राहुल गांधी महाराष्ट्रात आले, मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्यामुळे बीडचा अपराध देशपातळीवर गेला आणि फडणवीसांची बेअब्रू झाली. एका आदर्श सरपंचाची ज्या प्रकारे हत्या झाली त्याबद्दल खंत आणि खेद मनापासून आपण व्यक्त केलाय का? याबाबत आमच्या मनात संशय आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचीही हत्याच झाली आहे राहुल गांधी बरोबर बोलले आहेत त्याबद्दल. या दोन्ही हत्यांची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायलाच हवी. तुमचे मंत्री निर्लज्जांसारखे जात आहेत, तर ज्यांनी हत्या घडवल्या त्यांना पाठिशी घालत आहेत असंही ते यावेळी म्हणालेत.
माणुसकीचा खून
मागच्या पाच वर्षांत या राज्यात मानवता, माणुसकीचा खून होतो आहे. आम्हाला लाज वाटते की देवेंद्र फडणवीस विधानसभेत खोटं बोलले. ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे अशा व्यक्ती तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. आपण छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून दूर करु शकता पण एका खुनाचा संशय ज्यांच्यावर आहे अशा व्यक्तीला मंत्रिमंडळातून दूर ठेवत नाही कारण तुमचं जातीचं राजकारण आहे.
छगन भुजबळांना दूर ठेवलंय पण बीडसह महाराष्ट्राच्या मोठ्या जनतेचा ज्यांना विरोध आहे अशा व्यक्तीला राज्य मंत्रिमंडळात नको. या घोषणा अजित पवारांसमोरही देण्यात आल्या आहेत. मंत्री जाऊन भाषणं करत आहेत. त्यांनी खऱ्या आरोपींना पकडून ठेवा. आम्हाला म्हणजे विरोधकांना पकडाल तुम्ही, खोट्या गुन्ह्यांत अडकवालही. पण जे खरे गुन्हेगार आहेत, बीड आणि परभणीचे तुमचे गुंड आहेत त्यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणून जर देवेंद्र फडणवीस बोलले तर बरं होईल असंही ते म्हणाले.