Sanjay Raut : राज्य सरकार कोसळणार का असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. याबाबत आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले, सध्या जे मुख्यमंत्री आणि 40 लोकांचे राज्य आहे ते पुढील पंधरा दिवसात गडगडल्याशिवाय राहणार नाही. या सरकारचे डेथ वॉरंट निघालेले आहे. फिनीश, पुष्पचर्क अर्पण करा, अशा शब्दांत त्यांनी सरकारबाबत भविष्यवाणी केली.
‘माझ्या जावयाला अडकवण्याचा सरकारचा प्लॅन, ज्यांच्याशी जमलं नाही त्यांनीच’.. खडसेंचा घणाघात
राऊत आज जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, आज उद्धव ठाकरे जळगावात येत आहेत. माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर त्यांची पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेआधीच राजकीय पारा चढला आहे. राऊत यांनी आज केलेल्या या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
राऊत पुढे म्हणाले, सध्या जो तो आपापल्या पद्धतीने गणित मांडत आहे. आम्ही मात्र निर्णयाची वाट पाहत आहोत. पण, येत्या 15 ते 20 दिवसात हे सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही. याआधीही मी एकदा म्हणालो होतो की हे सरकार फेब्रुवारीपर्यंत कोसळेल. पण, न्यायालयाचा निकाल उशीरा लागत आहे. पण हे सरकार टिकणार नाही. सरकारचे डेथ वॉरंट निघाले आहे. आता सही कोणी आणि कधी करायचे हे देखील ठरल्याचे राऊत म्हणाले.
करुणा मुंडे करणार मोठा राजकीय गौप्यस्फोट; दाखवणार ‘तो’ व्हिडीओ
सभेआधी राजकारण जोरात
उद्धव ठाकरे यांची आज जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा होणार आहे. सभेआधीच राजकारणाचा पारा चढला आहे. मंत्री गुलाबराव पाटील आणि संजय राऊत यांच्यात जोरात शाब्दिक युद्ध सुरू आहे. शिंदे गटाने सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे तर संजय राऊत यांनी सरकार लवकरच कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे. सभेत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.