पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धा काही दिवसांपूर्वी वादात सापडली होती. कुस्तीचा आखाडा अहमदनगरमध्ये होणार की पुण्यात यावरुन पैलवानांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यावर शरद पवार आणि ब्रिजभूषण सिंह यांनी अखेर तोडगा काढला होता. आता 11 ते 14 जानेवारीदरम्यान पुण्यात ही स्पर्धा रंगणार आहे.
महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार 10 ते 14 जानेवारी 2023 या कालावधीत पुण्यात रंगणार आहे. यंदा या स्पर्धेचे 65 वे वर्षे आहे. सलग पाच दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. राज्यभरातील मल्ल एकमेकांशी भिडणार आहेत. 33 जिल्ह्यातील आणि 11 महापालिकामधील 45 तालीम संघातील 900 मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहे. यासह नामांकित 40 मल्लही सहभागी होणार आहेत.
पुण्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरीच्या उद्घाटन समारंभाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील तर समारोप व बक्षीस वितरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंग आदी उपस्थित राहणार आहेत. विविध दहा वजनी गटात, माती आणि गादी विभागात कुस्ती होणार आहे. 900 कुस्तीगीर, 90 व्यवस्थापक, 90 मार्गदर्शक, 125 तांत्रिक अधिकारी, 90 पदाधिकारी सहभागी होणार आहेत.