Devendra Fadanvis letsupp Marathi Poll : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये अनेक शहरांत दंगली झाल्या आहे. छत्रपती संभाजीनगर येथे रामनवमीच्या पार्श्वभूमीवर दंगल झाली होती. त्यानंतर अनेक मिरवणुकांमध्ये औरंगजेबाचे पोस्टर झळकावण्यात आल्याने अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी दंगल सदृश परिस्थिती निर्माण होऊन दगडफेक व गाड्या पेटवण्याच्या घटनाही झाल्या आहे.
आत्ताच दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूरमध्ये औरंगजेबाचे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवल्याने हिंदू समाजाच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्यावेळी दगडफेक देखील करण्यात आली होती. ही सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना कोल्हापूरातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता.
जम्मूत गुंजणार ‘जय महाराष्ट्र’! CM शिंदेंच्या प्रयत्नांना यश, मुंबईत पोहचण्यापूर्वीच मिळाली जमीन
तसेच राज्यातील विविध पक्षातील नेत्यांना धमक्या देखील येत आहे. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेत तक्रार दाखल केली. तसेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांकडून पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
राज्यातील अशा घटनांमुळे विरोधकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फैलावर घेतले. गृहमंत्र्यांचे लक्ष नसून त्यांची पोलीस प्रशासनावर पकड राहिलेली नाही, अशा शब्दात विरोधकांनी फडणवीसांना लक्ष्य केले आहे. यानंतर लेट्सअप मराठीने एक पोल घेतला असून त्यामध्ये फडणवीसांविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.
‘त्याने एकट्यानेच वर्ल्ड कप जिंकला’; धोनीच्या विषयावरुन हरभजन संतापला
राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांना धमक्या, विविध शहरातील दंगली हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे का? असा प्रश्न लेट्सअपच्या पोलमध्ये विचारण्यात आला होता. त्यावर 78 टक्के लोकांनी याला होय असे उत्तर दिले आहे. तर 22 टक्के लोकांनी याला नाही असे उत्तर दिले आहे. या पोलमध्ये 48 तासांत 57 हजार लोकांनी आपलं मत नोंदवलं आहे.
त्यामुळे या पोलवरुन नागरिक गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामकाजावर समाधानी नसल्याचे दिसत आहे. राज्यातील होणाऱ्या दंगलीच्या घटना आणि राजकीय नेत्यांना येणाऱ्या धमक्या यावर नागरिक गृहमंत्र्यांवर नाराज असल्याचे या पोलवरुन दिसून येत आहे. तसेच गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जनतेच्या मनातून उतरले आहे का?, असा प्रश्न विचारला जात आहे.