विधान परिषद मतमोजणीत मोठे उलटफेर होणार?, पहिल्या कलांमुळं राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Legislative Council Election Results 2026 : विधान परिषदेच्या पाच मतदारसंघांतील मतमोजणी सुरू असतानाच काही उमेदवारांनी आघाडी घेतली.

News Photo   2026 10 27T193633.175

Maharashtra Legislative Council Election Results 2026

Legislative Council Election Results : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच मतदारसंघांतील निवडणुकीची मतमोजणी सुरू असून मराठवाडा पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातील सुरुवातीचे कल समोर आले आहेत. (MLC) मराठवाडा पदवीधर मतदारसंघात पहिल्या फेरीत 70 हजार मतांची मोजणी पूर्ण झाली असून प्राथमिक अंदाजानुसार डॉ. प्रतापसिंह पाटील यांना 31 ते 32 हजार मते मिळत आहेत. विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना 20 ते 21 हजार मतांचा अंदाज असून रविराज साबळे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. डॉ. पाटील यांना सुमारे 45 ते 50 टक्के मते मिळत असल्याचा अंदाज असून हा कल कायम राहिल्यास पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये त्यांना आघाडी मिळू शकते.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे. एकुण 14 हजार मतांपैकी 13 हजार 705 मते वैध, तर 295 मते अवैध ठरली आहेत. सरनाईक यांना 3,903 मते मिळाली असून ते श्रीकांत देशपांडे यांच्यापेक्षा 1,694 मतांनी पुढे आहेत. देशपांडे यांना 2,209 मते मिळाली आहेत. अपक्ष सुरेश देवकर यांना 1,582, काँग्रेसच्या अदिती पोहरे यांना 1,319, तर उद्धव ठाकरे गटाच्या दत्तात्रय लहाने यांना 1,169 मते मिळाली आहेत. भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे यांना 698, तर शेखर भोयर यांना 432 मते मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीतही 14 पैकी 9 टेबलवर सरनाईक यांनी आघाडी कायम ठेवल्याची माहिती समोर आली आहे.

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत चुरस वाढली, चव्हाण-पाटील यांच्यात अटीतटीची लढत

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावंडे आणि अपक्ष सचिन सानप यांच्यात चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. सानप यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पाठिंबा दिल्यामुळे या लढतीकडे विशेष लक्ष लागले आहे. भाजपचे उमेदवार गावंडे यांच्यासमोर काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर आणि माजी आमदार दत्ता सावंत यांचेही आव्हान आहे. दुसरीकडे पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या डॉ. स्मिता जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख-जाधव आणि शिवसेनेतून बंडखोरी केलेले सुनील मोदी यांच्यात लढत होत आहे. या निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक 47 उमेदवार रिंगणात आहेत.

विधान परिषदेच्या पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विभाग पदवीधर, तसेच पुणे आणि अमरावती विभाग शिक्षक अशा पाच मतदारसंघांसाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीत एकुण 182 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात 62.78 टक्के, तर पुणे शिक्षक मतदारसंघात 85.87 टक्के मतदानाची नोंद झाली होती. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात 41, नागपूर पदवीधर मतदारसंघात 38 आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात 26 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप आणि विरोधी पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version