Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात यंदा राजकारण पूर्ण बदललं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. मागील निवडणुकीत भाजप सोबत असलेले उद्धव ठाकरे आता काँग्रेस आणि शरद पवारांचे मित्र आहेत. निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर घणाघाती टीका करत आहेत. राज्यातील जनतेची सहानुभूती कुणाच्या बाजूने आहे याचं उत्तर 4 जूनलाच तर मिळेलच पण, त्याआधी भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी होणार की वाढणार हा प्रश्न राज्यात कळीचा बनला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच मोठी निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कुणाचं पारड जड आहे? याचा अंदाज राजकीय निरीक्षकांना लावणे कठीण झालं आहे. मागील निवडणुकीत नेमकी काय परिस्थिती होती याची माहिती घेऊ या..
2019 मधील विधानसभेच्या निवडणुका शिवसेना आणि भाजपने एकत्रित लढल्या होत्या. याचा परिणामही चांगला झाला या निवडणुकीत युतीने बहुमत मिळवले. नंतर मात्र मुख्यमंत्रिपदाचा तिढा निर्माण झाल्याने युती तुटली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन केले. अडीच वर्षे सरकार व्यवस्थित चालले पुढे मात्र एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिंदेंनी भाजपसोबत घरोबा करत सरकार स्थापन केले. या राजकारणाचा मोठा धक्का आघाडीला बसला.
यानंतर पुढील दीड वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. पक्षातील आमदारांचा मोठा गट घेऊन अजित पवार यांनी सरकारमध्ये एन्ट्री घेतली. लोकसभा निवडणुकीआधी कोणतीही मोठी निवडणूक झाली नाही त्यामुळे लोकांचा कल कोणत्या गटाकडे आहे याचा अंदाज बांधणे राजकीय विश्लेषकांना कठीण जात आहे.
सन 2014 मधील निवडणुकीत भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला होता. या निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी 27.8 टक्के तर सीट शेअर 42.4 टक्के होता. यातून राज्यातील जनता भाजपच्या बाजूने असल्याचे तर दिसले होते परंतु हा पाठिंबा एक सलग नव्हता. विदर्भात सीट शेअर 71 टक्के आणि मतांची टक्केवारी 35.3 टक्के होती. पश्चिम महाराष्ट्रात सीट शेअर 32.8 टक्के आणि मतांची टक्केवारी 20.6 टक्के होती. कोकणात सीट शेअर 33.3 टक्के आणि मतांची टक्केवारी 26.5 टक्के होती. खानदेशात सीट शेअर 40.4 टक्के तर मतांची टक्केवारी 30.2 टक्के होती.
2014 मधील निवडणुकांच्या तुलनेत 2019 मध्ये कोकण आणि मराठवाड्यात शिवसेना भाजपच्या जागा वाढल्या होत्या. तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीला आघाडी मिळाली होती. त्यामुळे शिवसेना भाजपच्या जागा 185 वरून 161 वर आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर असे दिसून येते की यामध्ये चढ उतार राहिला आहे. 2009 च्या तुलनेत 2014 मध्ये मोठी वाढ झाली होती. 2019 मध्ये मात्र यात घट झाल्याचे दिसून आले. आताच्या अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे भाजप नेत्यांना चांगलच गोंधळात टाकलं आहे.
लोकसभेत बहुमत मिळालं नाही तर प्लॅन B काय?, अमित शाहांनी सगळं फोडूनच सांगितलं
राज्यात यंदा महायुती आणि महाविकास आघाडीत लढत आहे. भाजप 28, एकनाथ शिंदे शिवसेना 15, राष्ट्रवादी अजित पवार 4 जागांवर आणि राष्ट्रीय समाज पक्ष एका जागेवर लढत आहे. तर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे शिवसेना 21, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार 10 आणि काँग्रेस 17 जागांवर लढत आहे. तसेच एमआयएमने तीन मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी पक्ष, बहुजन विकास आघाडी आणि बसपा सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
2019 मधील लोकसभा निवडणुकीत एनडीएला 41 तर काँग्रेस आघाडीला फक्त पाच जागा मिळाल्या होत्या. यातही काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती. या निवडणुकीत एनडीएला 51.34 टक्के तर यूपीएला 32.07 टक्के मते मिळाली होती. या निवडणुकीत भाजपने 23 आणि शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या. पक्षाला 23.5 टक्के मते मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती. पक्षाच्या मतांची टक्केवारी 16.41 टक्के होती.