Sanjay Shirsat on Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालानंतर आता राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराचा (Maharashtra Cabinet Expansion) मुद्दा ऐरणीवर आला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल असे बोलले जात होते. त्यानुसार आता लवकरच हा रखडलेला विस्तार होणार असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला.
शिरसाट म्हणाले, विस्तार लवकरच होईल. वीस आमदार शपथ घेतील असा अंदाज आहे. विस्तार झाल्यानंतर राज्य सरकारचे कामकाज आधिक गतीमान होईल.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. यानंतर आता भाजप अधिक सावधगिरीने पावले टाकत आहे. लवकरच केंद्रात शिंदे गटाला मंत्रिपदे दिली जाणार असल्याची चर्चा आहे. यावर शिरसाट म्हणाले, केंद्रात शिंदे गटाला मंत्रिपद मिळेल की नाही हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. याबद्दल मला जास्त काही माहिती नाही. मात्र, दोन मंत्रिपदे तरी नक्कीच मिळतील अशी स्थिती आहे.
फडणवीस – पवारांचा पहाटेचा शपथविधी ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी; मुनगंटीवारांचा मोठा गौप्यस्फोट
दरम्यान, सध्याचा विचार केला तर मंत्रिमंडळात वीस मंत्री आहेत. विस्तार रखडल्याने एकाच मंत्र्याकडे दोन ते चार खात्यांचा कारभार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर तब्बल सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री पद आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही महसूलमंत्री पदाबरोबरच नगर आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे जालना आणि बीड जिल्ह्यांचे पालकमंत्री पदाचा कार्यभार आहे. आणखीही काही मंत्री अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत.
त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होणे गरजेचे आहे. मात्र, सत्तासंघर्षाचा निकाल येत नव्हता त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. या प्रक्रियेत विलंब होत असल्याने जे आमदार मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत होते त्यांची अस्वस्थता वाढत चालली आहे. काही आमदारांनी तर जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली होती. त्यामुळे सरकारचे टेन्शन वाढले होते.
महाराष्ट्रातले मंत्री कमिशनखोर, खासदार इम्तियाज जलील यांच्या आरोपाने खळबळ