Maharashtra MLC Election : विधानपरिषदेच्या (Maharashtra Legislative Council Election) रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 5 जागांसाठी 27 मार्चला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भारतीय जनता पार्टीने यात आघाडी घेतली असून तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. संजय किणीकर, संदीप जोशी आणि दादाराव केचे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीत ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार निर्णय घेत भाजपने तिघा उमेदवारांना तिकीट फायनल केल्याचे सांगण्यात येत आहे.
या निवडणुकीसाठी उमेदवारांना 10 मार्च ते 17 मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहे. तर 18 मार्च रोजी अर्जांची छाननी होणार आहे. तर 20 मार्च रोजी उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे आणि 27 मार्च रोजी विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. उद्या सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भाजपाचे उमेदवार उद्याच उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
मोठी बातमी! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर
संदीप जोशी नागूपुरातून येतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनही जोशी यांची ओळख आहे. संजय केनेकर छत्रपती संभाजीनगरचे आहेत. याआधी त्यांनी पक्षाचे महामंत्री म्हणून चांगलं काम केले आहे. दादाराव केचे यांना विधानसभा निवडणुकीत संधी नाकारण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मोठा प्रश्न भाजपसमोर होता. यावर तोडगा काढून त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.
विधानपरिषदेत पाच जागा रिक्त आहेत. या पाच जागांसाठी महायुतीत भाजप 3, अजित पवार आणि एकनाथ शिंदे गट प्रत्येकी 1 असा फॉर्म्युला ठरला होता. यानुसार भाजपने तीन जणांना उमेदवारी निश्चित केली आहे. यानंतर आता शिंदे आणि अजित पवार गटाच्याही उमेदवारांची नावे आजच निश्चित होतील असे सांगण्यात येत आहे. या दोन्ही गटांकडून काही नावांवर विचार केला जात आहे.
माधव भंडारी मागील अनेक वर्षांपासून भाजप आणि संघ परिवारात अत्यंत निष्ठेने काम करत आहेत. 2014 मध्ये राज्यात भाजपाची सत्ता आल्यापासून माधव भंडारींना एकदाही महत्वाचे पद दिले गेले नाही. विधानपरिषद किंवा राज्यसभा निवडणूक येते त्या प्रत्येक वेळी माधव भंडारींची चर्चा होते. परंतु, तिकीट काही त्यांना मिळत नाही. आताही असेच घडले आहे. यंदा तरी त्यांना तिकीट मिळेल असे सांगितले जात होते परंतु, तसे घडले नाही. माधव भंडारींचा विचार पक्षाने केला नाही. जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
विधानपरिषदेसाठी मराठवाड्यातील ‘या’ दोन नावांपैकी एकाला संधी, इच्छुकांची मोठी रस्सीखेच
अजित पवार राष्ट्रवादीतही इच्छुकांची संख्या मोठी आहे. परंतु, पक्षाला फक्त एक जागा मिळाली आहे. त्यामुळे उमेदवारी द्यायची तरी कुणाला असा प्रश्न अजित पवार यांच्यासमोर आहे. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीकडून झिशान सिद्दीकी, संजय दौंड आणि उमेश पाटील यांना अर्ज भरण्यासाठी कागदपत्रे तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या तिघांपैकी एकाला संधी मिळेल अशी शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार कुणाचं नाव फायनल करणार याची माहिती थोड्याच वेळात समोर येईल.