Maharashtra Monsoon Withdrawal: महाराष्ट्रातून नैऋत्य मोसमी पावसाने परतीचा प्रवास सुरू केला आहे. मुंबईसह राज्यातील काही भागांतून मान्सून परतू लागल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी जाण्यासाठी हवामानाची परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील यंदाचा पावसाळी हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 48 तासांत देशातील आणखी काही भागांतून मान्सूनच्या परतीला सुरुवात होऊ शकते. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशातील उर्वरित भाग, गुजरात आणि मध्य प्रदेशातील बहुतांश भागातून मान्सून माघारी फिरण्याची शक्यता आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील काही भागांचाही यात समावेश आहे.
मान्सून माघारीचा प्रवास सुरू झाला असला तरी दक्षिण भारतातील काही भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. केरळमध्ये तर काही भागांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
देशात यंदा पावसाची तूट
यंदाच्या जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून हंगामात देशभरात कमी पाऊस झाला. देशासाठी या कालावधीत 868.6 मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात 759.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. म्हणजेच देशात सरासरीच्या 87.4 टक्के पाऊस झाला आहे.
1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत देशात 12.6 टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली. 2001 नंतरच्या मान्सून हंगामांचा विचार करता यंदाचा हंगाम देशातील चौथा सर्वात कमी पावसाचा ठरला आहे. महाराष्ट्रातून मान्सून पूर्णपणे कधी माघारी फिरतो आणि त्यानंतर राज्यात परतीचा पाऊस किती राहतो, याकडे आता शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
