Maharashtra Lok Sabha Election : महायुतीत अजूनही काही जागांवर उमेदवार निश्चित झालेले नाहीत. यामध्ये मुंबईतील मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबईतील सहापैकी दोन मतदारसंघ शिंदे गटाच्या वाट्याला येतील असे सांगितले जात आहे. या मतदारसंघात शिंदे गटाकडून ज्या संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू आहे त्या नावांना मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध केला आहे. या विरोधामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी याबाबत पक्षाची भूमिका मांडली आहे. मनसेने दोन उमेदवारांच्या नावाला कडाडून विरोध केला आहे. उत्तर पश्चिम मतदारसंघातू ज्या दोन नावांची चर्चा सुरू आहे त्यात रवींद्र वायकर आणि संजय निरुपम या दोन नेत्यांचा समावेश आहे.
Raj Thackeray : भाजपाला पाठिंबा देताच मनसेला गळती, राज यांना पत्र लिहीत सरचिटणीसाचा राजीनामा
याबाबत शालिनी ठाकरे यांनी एक ट्विट केलं आहे. मनसेला धनुष्यबाण चिन्हावर लढायला सांगणाऱ्यावर दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. इकडून तिकडून पालापोचाळ्यासारखा उडत आलेला महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रवींद्र वायकर सारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठिंबा गृहीत धरू नये, असा इशारा शालिनी ठाकरे यांनी या ट्विटद्वारे दिला आहे.
मनसेला 'धनुष्य बाण' चिन्हावर लढायला सांगणार्यावर दुसर्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे.
लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा दिला आहे.
इकडून तिकडून पाला पाचोळ्या सारखा उडत आलेला…— Shalini Thackeray (@ThakareShalini) April 23, 2024
मनसेने लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला पाठिंबा दिला आहे. मनसे या निवडणुकीत उमेदवार देणार नाही. पण, पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. या राजकारणाचा महायुतीला फायदा होणार आहे. मनसेची नाशिक, पुणे, ठाणे, कल्याण मुंबई या शहरांत चांगली ताकद आहे. त्यामुळे येथे मनसेची ताकद महायुतीच्या पारड्यात पडणार आहे. त्यामुळे निवडणुकीपर्यंत मनसेला सांभाळून घेणे महायुतीला भाग पडणार आहे.
परंतु, महायुतीचे काही संभाव्य उमेदवार मनसे नेत्यांना खटकू लागले आहेत. त्यामुळे या उमेदवारांना तिकीट जाहीर होण्यााआधीच मनसेने विरोधाला सुरुवात केली आहे. शिंदे गटाच्या संभाव्य उमेदवारांना मनसेने विरोध केला आहे. यामध्ये रवींद्र वायकर आणि संजय निरुपम या नावांचा समावेश आहे. दोन्ही नेते मूळचे शिंदे गटातील नाहीत. तरीदेखील शिंदे गटाकडून त्यांचा विचार सुरू असल्याने मनसेने विरोध सुरू केला आहे. यानंतर आता मुख्यमंत्री मनसेच्या या विरोधाची दखल घेतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.