Download App

महाविकास आघाडी सत्तेत आल्यास मुख्यमंत्री कोणाचा? शरद पवारांनी दिलं ‘हे’ उत्तर

Sharad Pawar : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) मुख्यमंत्रीपदाबाबत वेगळी वक्तव्ये करत आहेत. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल असा राऊतांचा दावा आहे. तर नाना पटोले यांनी ज्या पक्षाच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री होईल, जर महाविकास आघाडी झाली नाही तर काँग्रेसकडे प्लॅन बी तयार आहे, असे म्हटले आहे. नेत्यांच्या या परस्पर विरोधी दाव्यांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या मुद्द्यावर मत व्यक्त केले आहे. पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना नाना पटोलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली.

Karnataka Assembly election : फडणवीस मराठी भाषिकांविरोधात मैदानात उतरलेत, पवारांचे टीकास्त्र

त्यावर शरद पवार म्हणाले, साधारणपणे तसंच असतं. ज्याचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. यात फारसं चुकीचं नाही. मात्र, महाविकास आघाडीची याबाबत चर्चा झालेली नाही. ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. महाविकास आघाडीचा निर्णय होत नाही तोपर्यंत मत मांडायला काही हरकत नाही, असे पवार म्हणाले.

दरम्यान, याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल असे म्हटले होते. महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असणार आणि हे जवळपास सर्वांनीच मान्य केले आहे. तितक्या वेगाने आमचा पक्ष पुढे जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भविष्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येऊ शकतो. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली होती. पटोले म्हणाले, जयंत पाटील यांनी कशाच्या आधारे हे वक्तव्य केलं ते माहिती नाही मात्र, ज्या पक्षाच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री असे असते. या मुद्द्यावर काँग्रेसला जास्त चर्चा करायची नाही.

Barsu Refinery Project : सरकारनं जबरदस्ती केल्यास लोकं ऐकणार नाहीत…

Tags

follow us