Mumbai Terrorist : आर्थिक राजधानी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबई शहरात शुक्रवारी पहाटे तीन अतिरेकी घुसल्याचा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात खणखणला. या प्रकाराने खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. लागलीच पोलिसांकडून खरेच असे दहशतवादी शहरात घुसले आहेत का, याचा कसून शोध घेतला जात आहे.
तीन दहशतवादी मुंबईत आल्याचा पोलीस नियंत्रण कक्षात फोन आला आहे. हे दहशतवादी दुबईहून शुक्रवारी पहाटे मुंबई शहरात आल्याचा फोन करणाऱ्या व्यक्तीने केला आहे. त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा दावाही या व्यक्तीने केला आहे.
एका व्यक्तीने फोन करून तीन अतिरेकी मुंबईत घुसल्याची माहिती पोलिसांना दिली. वाहनाचा नंबरही पोलिसांना दिला. या अतिरेक्यांचा दोन नंबरचा धंदा असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले आहे. या फोन कॉलनंतर मुंबईतील पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शहरात खरेच असे अतिरेकी घुसले आहेत का याचा शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आले. झी 24 तास वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची घटना अजूनही कुणी विसरलेले नाही. त्यामुळे शहरात नेहमीच सुरक्षा व्यवस्था अलर्ट असते. जेव्हा अशी काही माहिती मिळते किंवा संशयास्पद हालचाली दिसतात त्यावेळी यंत्रणा अलर्ट होतात. आताही हा फोन कॉल आल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. शहरात दहशतवादी घुसले आहेत याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात यापेक्षा जास्त माहिती अद्याप मिळालेली नाही.