Uddhav Thackeray : ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्या, जे गेलेत त्यांना जय महाराष्ट्र. आता त्यांचा आणि आपला संबंध तुटला. आता गेल्यानंतर त्यांनी पक्षाशी गद्दारी करू नये. पक्षाच्या विरोधात काम करू नये अन्यथा शिवसैनिक म्हणून त्यांना दाखवावेच लागेल असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून शिंदे गटात दाखल झालेल्या नेत्यांना दिला.
ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रमोद शेंडे यांच्या नेतृत्वात सायन कोळीवाडा येथील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना भेटायला आले होते. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते पुढे म्हणाले, निवडणूक जिंकल्यानंतर मी विचार केला की आपण निवडणूक तर जिंकलो. यांना असं काय मिळालं की या रडत आहेत. या अश्रूंचं मोल ज्याला कळतं ना तोच खरा निष्ठावान आहे. या अश्रूंच्या मागे मेहनत आहे. या मेहनतीने अनेकांना मोठं केलं. पण, ज्यांना अजीर्ण झालं ते निघून गेले.
एक-एक काय फोडता, हिंमत असेल तर निवडणुका घ्याच; उद्धव ठाकरेंचं भाजपला चॅलेंज!
मला एका गोष्टीचा अभिमान आहे. 2007 ची निवडणूक असेल. त्यावेळीही असच वातावरण होतं की शिवसेनेचं काय होईल?, महापालिकेत शिवसेना जिंकणार की हरणार? असे प्रश्न विचारले जात होते. पण, आपण निवडणूक जिंकली. त्यावेळीही अशीच गर्दी आजूबाजूला पसरली होती. काही महिला समोर होत्या. त्यांना तर आनंदाचे अश्रू आवरत नव्हते अशी आठवण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितली.
ते पुढे म्हणाले, ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या. जे गेलेत त्यांना जय महाराष्ट्र. आता त्यांचा आणि आपला संबंध तुटला फक्त गेल्यानंतर त्यांनी पक्षाशी गद्दारी करू नये, पक्षाच्या विरोधात काम करू नये. नाहीतर शिवसैनिक म्हणून आपल्याला त्यांना दाखवावे लागेल, असा इशाराच त्यांनी शिंदे गटाला दिला.