Download App

मराठवाड्याचं पाणी बारामतीनं अडवलं? फडणवीसांच्या आरोपावर अजितदादांचं उत्तर

Ajit Pawar replies Devendra Fadnavis : मराठवाड्याचे पाणी बारामतीत अडवले होते. पण आमचं सरकार आल्यानंतर ते पाणी पुन्हा मराठवाड्याला देण्याचं काम सरकार करत आहे, असे वक्तव्य करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अप्रत्यक्षपणे पवार कुटुंबावर टीका केली होती. याच टीकेवर आज विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले.

पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, बारामतीत कोणतही पाणी अडवले नाही. कृष्णा भीमा स्थिरीकरण संदर्भात फडणवीस यांनी वस्तुस्थिती सांगावी. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात बैठका झाल्या होत्या. त्यावेळी महाराष्ट्र कृष्णा विकास महामंडळाच्या अधिकारात येणारे मराठवाड्याचे हक्काचे पाणी जे उस्मानाबाद आणि बीड या जिल्ह्यांना मिळणार आहे ते त्यांना मिळाले पाहिजे असा निर्णय झाला होता.

ते पुढे म्हणाले निरा नदीचे पाणी चंद्रभागा नदीत न जाता बोगद्याद्वारे उजनीत आले. त्यानंतर उजनीतून पाणी उचलून मराठवाड्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी वस्तुस्थिती आहे. यामध्ये बारामतीचा काहीच संबंध नाही. फक्त बारामतीच नाव घेतलं की त्याला वेगळे महत्व प्राप्त होते. बारामतीचे नाव घेतलं की ब्रेकिंग न्युज होते बाकी काही नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले.

काय म्हणाले होते फडणवीस ?

मराठवाड्याचे पाणी बारामतीत अडवले होते. पण आमचं सरकार आल्यानंतर आम्ही मराठवाड्याला पाणी देण्याचं काम करत आहोत. आमच्या सरकारच्याच काळात कृष्णा प्रकल्पाला निधी दिला गेला आणि बोगद्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. पुढे त्याला सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता होती. पण, मागील अडीच वर्षे असणाऱ्या राज्यातील सरकारने याबाबत एक शब्दही काढला नाही.

Tags

follow us