युद्धाचा फटका लग्नसराईला; गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे कॅटरिंग व्यावसायिकांनी ऑर्डर्स थांबवल्या
कॅटरिंग व्यावसायिकांनी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, 15 मार्च 2026 पासून नवीन कॅटरिंग ऑर्डर स्वीकारण बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
Catering professionals take big decision due to gas cylinder shortage : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता थेट भारतातील व्यवसायांवर दिसू लागला आहे. विशेषतः गॅस पुरवठ्यावर त्याचा परिणाम होत असून त्याचा फटका हॉटेल व्यवसायिकांसोबतच कॅटरिंग व्यवसायालाही बसू लागला आहे. कॅटरिंग व्यवसायिकांनी याबाबत गंभीर चिंता व्यक्त करत मोठा निर्णय घेतला आहे. मोठ्या प्रमाणावर लग्नसमारंभ, वाढदिवस, सामाजिक कार्यक्रम आणि विविध सोहळ्यांसाठी कॅटरिंग सेवा पुरवली जाते.
दररोज हजारो लोकांसाठी जेवण बनवणाऱ्या या व्यवसायिकांना सध्या गॅस सिलेंडरच्या टंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. अनेक कॅटरिंग व्यावसायिकांकडे सध्या केवळ तात्पुरती सिलेंडर व्यवस्था शिल्लक आहे. मात्र हे सिलेंडर संपल्यानंतर पुढे काय करायचे, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर कॅटरिंग व्यावसायिकांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, 15 मार्च 2026 पासून नवीन कॅटरिंग ऑर्डर स्वीकारणे तात्पुरते बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
देशात गॅस तुटवडा! पु्ण्यात मेस बंद स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी निघाले गावाकडं…
गॅसचा पुरेसा पुरवठा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत नवीन कार्यक्रमांचे ऑर्डर घेणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कॅटरिंग व्यवसायिकांचे म्हणणे आहे की, सध्या गॅस एजन्सींना संपर्क साधला असता एकही अतिरिक्त सिलेंडर उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मोठ्या कार्यक्रमांसाठी जेवण बनवणे अत्यंत कठीण झाले आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू असताना हजारो पाहुण्यांसाठी अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर जेवण तयार करावे लागते. अशा वेळी गॅसचा पुरवठा नसेल तर कामकाज पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे.
पूर्वीप्रमाणे लाकडी चुलींवर जेवण बनवण्याचा पर्याय असला तरी आधुनिक कॅटरिंगच्या कामात तो व्यवहार्य नाही. मोठ्या प्रमाणात आणि कमी वेळेत जेवण तयार करणे चुलीवर शक्य नसल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. त्यामुळे सध्या संपूर्ण कॅटरिंग उद्योगासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. यामुळे लग्नसमारंभ, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम आणि इतर सामाजिक सोहळे आयोजित करणाऱ्या नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. गॅस टंचाईची ही समस्या लवकरात लवकर सोडवावी आणि कॅटरिंग व्यवसायिकांना सुरळीत गॅस पुरवठा करावा, अशी मागणी व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा आगामी काळात अनेक कार्यक्रमांवर याचा थेट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
