Ajit Pawar Criticized Shinde Fadnavis Government : महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कामांवरील स्थगित अजून उठलेली नाही. ती काही आमच्या घरची कामं नाहीत. काय कारण आहे ? सत्ता बदलत असते कुणी कायमचं त्या खुर्चीवर नसतं. उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता दाखवून देईल. कर्नाटकात कसं दाखवून दिलं अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेतला.
अजित पवार यांनी आज कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. ते म्हणाले, मी अर्थमंत्री म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. जयंत पाटील, सुनील तटकरे देखील अर्थमंत्री राहिले आहेत. मात्र आता राज्यात आर्थिक शिस्त राहिलेली नाही.
‘आता काय दोन हजारांच्या नोटा द्या, बदलून घ्या’.. नोटबंदीच्या निर्णयावर अजितदादा संतापले
आमच्या कारकिर्दित विकास व्हावा असेच आम्हाला वाटते. राज्यावर एक लाख कोटींची बिले देणे बाकी आहेत. भ्रष्टाचार वाढलाय. राज्यकर्त्यांना 10 ते 11 महिने झाले आहेत. जूनमध्ये वर्ष होईल. आर्थिक शिस्त कुठे गेली. वर्षभरात गद्दार, 50 खोके हे शब्द जनतेला पटलेले आहेत. आता तुम्ही काय केले हे नागरिकांना सुद्धा माहिती आहे, असे पवार म्हणाले.
आरबीआयने दोन हजार रुपयांची नोट मागे घेण्याच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. मागे एकदा सरकारनं सांगितलं की 500 रुपयांची नोट बंद. काल फतवा काढला की दोन हजार रुपयांची नोट बंद. याला काय अर्थ राहिला आहे का ? आता दोन हजारांच्या नोटा द्या आणि बदलून घ्या. आपल्या देशाने इंदिरा गांधींचा काळ पाहिला. वाजपेयींचा काळ पाहिला. मोदींच्या आधी मनमोहन सिंह पंतप्रधान होते आपण तोही काळ पाहिला. काही निर्णय राज्यकर्ते म्हणून घ्यावे लागतात. नकली नोटा, बनावट नोटा, बाहेरच्या लोकांनी चलन अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तर बदल करावे लागतात याबद्दल दुमत नाही. पण हे सारखं सारखं का करावं लागतंय याचा विचार केला पाहिजे.
दोन हजारांची नोट बंद करण्याचा फतवा आहे. सारखे सारखे निर्णय बदलले जातात. मागच्यावेळी जेव्हा असे केले तेव्हा लोकांनी खूप सहन केलं. तीन महिन्यात लोकांना इतका त्रास होईल वाटत नाही. मात्र दोन हजारांची नोट बंद करण्याचं कारण काय? असा सवाल पवार यांनी केला.
जागावाटपाचं अजून ठरलं नाही
आगामी निवडणुकीतील जागा वाटपासंदर्भात जे दावे केले जात आहेत त्यामध्ये काहीही तथ्य नाही. अजूनही तिन्ही पक्षातील दोन-दोन व्यक्ती येऊन चर्चा करणार आहे ती चर्चा झालेली नाही. जागा वाटपासंदर्भात वरिष्ठ पातळीवर अंतिम निर्णय होईल त्यावेळी सर्वांना अधिकृत माहिती दिली जाईल,असे पवार यांनी सांगितले.