Sanjay Raut : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा तीन दिवसांपूर्वी केली. त्यांच्या या घोषणेनंतर राजकारण ढवळून निघाले आहे. पक्षातील वरिष्ठ नेते, कार्यकर्त्यांनी त्यांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. यावर त्यांनी दोन दिवसांत अंतिम निर्णय कळवतो, असे त्यांनी काल सांगितले. या सर्व घडामोडींनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज एक सूचक ट्विट केले आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष निवड समितीची बैठक वाय. बी. सेंटरमध्ये होणार आहे. त्याआधी राऊत यांनी ट्विट केले आहे. राजकारणात अपघाताने काहीच घडत नाही. जर असं घडत असेल तर त्यादृष्टीने ती घटना नियोजित केलेली असते. यावर मी पैज लावू शकतो.
सुप्रिया सुळेंकडे पक्ष सोपवण्याचा पवारांचा प्लान? मित्राकडूनच मोठा दावा
या ट्विटमध्ये राऊत यांनी कुणाचेच नाव घेतले नाही. मात्र, सध्या राज्यात ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत त्या अनुषंगाने त्यांनी ट्विट केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीआधीच त्यांनी हे ट्विट केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार यांनी हा निर्णय का घेतला, याबाबत तेच सांगू शकतात. जिथे शरद पवार आहेत तिथे राष्ट्रवादी पक्ष आहे. मात्र त्यांच्या या निर्णयाचा महाविकास आघाडीवर काहीच परिणाम होणार नाही, असे राऊत यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत म्हटले होते.
Good morning! pic.twitter.com/lOKUTZFRWx
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 5, 2023
ते पुढे म्हणाले, 1990 च्या दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा राजीनामा दिला होता. मात्र त्यावेळी शिवसैनिकांचा रेटा इतका जबरदस्त होता की त्यांना त्यांचा निर्णय मागे घेत पुन्हा शिवसेनाप्रमुख पद स्वीकारावे लागले होते. या घटनांचा मी स्वतः साक्षीदार आहे.
पवारांनी घेतलेल्या या निर्णयांसदर्भात आता त्यांच्या पक्षाच्या बैठका सुरू आहेत. सध्या त्यांचा पक्ष गोंधळलेल्या अवस्थेत आहे. म्हणून आजच आम्ही पवारांकडे जाऊन त्यांना भेटणे योग्य होणार नाही. पण आमचा संवाद सुरू आहे. या निर्णयाचा महाविकास आघाडीवर काहीच परिणाम होणार नाही. आघाडीवर परिणाम होईल असा काही संबंध तुम्हीही जोडू नका, असे राऊत यांनी पत्रकारांनाही सांगितले होते.