अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणांबरोबर शेरोशायरी; विधानसभेत फडणवीसांचा ‘शायराना’ अंदाज
अर्थसंकल्पीय अधिवेशनातील घोषणांइतकीच त्यांच्या भाषणातील शेरोशायरी आणि कवितांची देखील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
Fadnavis’ ‘Shayarana’ prediction in the Assembly : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्वपूर्ण घोषणा करत शेतकरी आणि महिलांसाठी मोठे निर्णय जाहीर केले आहेत. अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मोठी घोषणा केली, तर महिलांसाठी सुरू असलेल्या योजनांना पुढे देखील चालू ठेवण्याची ग्वाही दिली. मात्र या घोषणांइतकीच त्यांच्या भाषणातील शेरोशायरी आणि कवितांची देखील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ केले जाणार आहे. तसेच जे शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करतात अशा पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर स्वरूपात 50 हजार रुपयांपर्यंतची मदत दिली जाणार असल्याचं देखील स्पष्ट केलं आहे.
कर्जमाफीची प्रक्रिया पारदर्शक आणि प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य सरकारकडून एक समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. या समितीच्या शिफारशींवर आधारित बँकिंग व्यवस्थेची कार्यक्षमता सुनिश्चित केली जाईल आणि दीर्घकालीन धोरणात्मक योजना तयार करण्यात येईल, असे देखील त्यांनी सांगितले.
याचबरोबर महिलांसाठी सुरू असलेली लाडकी बहीण योजना पुढे देखील सुरू राहणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या योजनेसाठी अर्थसंकल्पात आवशयक आणि मजबूत तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी लवकरच स्वतंत्र धोरण जाहीर करण्यात येणार असून त्याद्वारे 25 लाख महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना कोट्यधीश बनण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
दरम्यान, अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी केलेल्या शेरोशायरी आणि कवितांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी म्हणले,
जब इरादा बना लिया ऊँची उड़ान का,
फिर देखना फिजूल है कद आसमान का…
तसेच दुसऱ्या शेरमध्ये त्यांनी म्हणले
डर मुझे भी लगा फासला देख कर,
पर मैं बढ़ता गया रास्ता देख कर,
खुद ब खुद मेरे नज़दीक आती गई,
मेरी मंज़िल मेरा हौसला देख कर…
याशिवाय राज्याच्या विकासाची दिशा स्पष्ट करत त्यांनी प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार सूत्रांवर आधारित एक कविता सादर केली
युग नवे प्रगतीचे,
शाश्वत अन् दमदार विकासाचे,
सुशासन अन् सर्वसमावेशकतेचे,
नाविन्यतेचे अन् पारदर्शी प्रामाणिकतेचे,
सूत्र हेच विकसित महाराष्ट्राचे!
अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणांसोबतच मुख्यमंत्र्यांच्या या काव्यात्मक शैलीची सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
