Download App

ठाकरे-राऊतांचा अध्यक्षांना दम; फडणवीस म्हणाले, दबावाला बळी न पडता योग्य वेळी…

Devendra Fadnavis on Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) काल सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. या निकालामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यानंतर आता विरोधकांनी दबावाचे राजकारण सुरू केले आहे.

न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आता अध्यक्षांना निर्णय घ्यावाच लागणार आहे. अध्यक्षांना निर्णय टाळता येणार नाही. तसे केले नाही तर त्यांना कळेल की महाराष्ट्र काय आहे, असा इशारा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला होता. त्यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही प्रतिक्रिया दिली. फडणवीस यांनी आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Video : ‘भाजपला नैतिकतेची शिकवणी पवार साहेबांसाठी कठीणच’.. फडणवीसांचा खोचक टोला

फडणवीस म्हणाले, न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे सर्व अधिकार अध्यक्षांना दिले आहेत. त्यासाठी वेळही सांगण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रकारे जर स्पीकरवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ते फ्री अँड फेअर प्रकारच्या न्यायप्रक्रियेत बसत नाही. मला वाटत नाही की स्पीकर कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडतील. सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष निष्णात वकील आहेत. त्यामुळे माझी अपेक्षा आहे जे कायद्यात आणि संविधानात आहे आणि जे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे त्यानुसार विधानसभेचे अध्यक्ष योग्य वेळी योग्य निर्णय करतील.

राऊत काय म्हणाले ?

सरकार बेकायदेशीर, अपात्र ठरवले आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असे निकालात म्हटले आहे. म्हणजे आता अध्यक्षांना 90 दिवसांत त्यांना निर्णय घ्यावा लागेल. निर्णय घेतला नाही तर त्यांना कळेल महाराष्ट्र काय आहे.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा राजकीय इतिहास तपासून पहा. त्यांनी अनेक पक्ष बदलले, आचार विचार नाही आणि ते त्या पदावर असतांना बोलता येत नाही. सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या निकालानंतर त्यांना आता आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावाच लागणार असल्याचे राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले ?

उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले होते, की राज्यात सध्या बेबंदशाही सुरू आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे जाणार आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिणार आहे. विधानसभा अध्यक्षांना लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती करणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिल्यास आम्ही त्या विरोधीत कोर्टात जाऊ, असा इशारा देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

Tags

follow us