Sanjay Raut vs Ajit Pawar : शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) ऑन कॅमेरा थुंकले. या प्रकाराने राज्यातील राजकारण ढवळून निघाले असून राऊत यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्येकाने बोलताना भान ठेवलं पाहिजे, असे म्हटले होते. त्यावर राऊत यांनी पलटवार करत धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेलं बरं असे वक्तव्य करत अजित पवार यांना त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची आठवण करून दिली.
राऊत यांच्या याच वक्तव्यावर प्रसारमाध्यमांनी अजित पवार यांना व विचारले. त्यावर पवार यांनी जास्त बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले, ती मोठी माणसं आहेत मी काही बोलू इच्छित नाही. ते काहीही बोलले तरी आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत. ती मोठी माणसं आहेत आम्ही त्यांचा आदर करतो. पण, ही आपली संस्कृती निश्चितच नाही. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. मला त्याबद्दल काहीच बोलायचंच नाही, असे पवार म्हणाले.
दरम्यान, याआधी संजय राऊत यांनी अजित पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं असे म्हणत अजितदादांना डिवचले होते. आम्ही भोगतो आहोत. आम्ही सगळं भोगूनही जमिनीवर उभे आहोत. मी माझ्या पक्षाबरोबर ठामपणे उभा आहे.आमच्या मनात पक्ष बदलण्याचा आणि संकटं येत आहेत म्हणून भाजपसारख्या पक्षाबरोबर सूत जुळवण्याचा आमचा विचार होत नाही.
काय म्हणाले होते अजित पवार?
अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रात संस्कृती, परंपरा आहे. आपला काही इतिहास आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असू शकतो आणि काम करु शकतो ते देशाला दाखवून दिलं आहे. मला दुसरी एक बाजू ऐकायला मिळाली की, ते म्हणाले की मला काहीतरी त्रास होत होता म्हणून तसं केलं. माझा त्यामागचा हेतू तो नव्हता असंही त्यांनी म्हटलं. पण प्रत्येकानं तारतम्य ठेवून वागावं, असे अजित पवार म्हणाले.