Coromandel Express Accident : 42 वर्षांमधील भारतातील सर्वात मोठे रेल्वे अपघात, उत्तर प्रदेशमध्ये झाली सर्वाधिक हानी

Coromandel Express Accident : 42 वर्षांमधील भारतातील सर्वात मोठे रेल्वे अपघात, उत्तर प्रदेशमध्ये झाली सर्वाधिक हानी

Train Accidents : ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी मोठा रेल्वे अपघात झाला. स्टेशनजवळ 3 गाड्या एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी माहितीप्रमाणे, रेल्वे अपघातात 233 लोकांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, असे ते म्हणाले. सध्या मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान, मागील काही रेल्वे अपघातांवर नजर टाकल्यास 2016 नंतरचा हा सर्वात मोठा अपघात आहे. 2012 सालापासून असे 7 मोठे रेल्वे अपघात झाले आहेत. यातील सर्वाधिक रेल्वे अपघात उत्तर प्रदेशात झाले आहेत.

मागील 42 वर्षांमधील सर्वात मोठे रेल्वे अपघात :

  • 6 जून 1981 – अचानक आलेल्या वादळ आणि मुसळधार पावसामुळे बिहारमधील बागमती नदीच्या पुलावर मोठा रेल्वे अपघात झाला होता. संपूर्ण रेल्वे नदीत पडली होती. या अपघातात सुमारे 800 लोकांचा मृत्यू झाला होता.
  • 27 जानेवारी 1982 – आग्राजवळ दाट धुक्यात मालगाडी आणि एक्स्प्रेस पॅसेंजर ट्रेनची समोरासमोर धडक होऊन 50 जणांचा मृत्यू झाला होता.
  • 18 एप्रिल 1988: उत्तर प्रदेशातील ललितपूरजवळ कर्नाटक एक्स्प्रेस रुळावरून घसरली, यात 75 जणांचा मृत्यू झाला होता.
  • 08 जुलै 1988: केरळमधील अष्टमुडी तलावात आयलँड एक्स्प्रेस पडून 107 जणांचा मृत्यू झाला होता.
  • 14 मे 1995: सालेमजवळ मद्रास-कन्याकुमारी एक्स्प्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली होती. यात 52 जणांचा मृत्यू झाला होता.
  • 20 ऑगस्ट 1995 – दिल्लीला जाणाऱ्या पुरुषोत्तम एक्स्प्रेसची उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे कालिंदी एक्स्प्रेसची समोरासमोर धडक झाली होती. या अपघातात 358 जणांचा मृत्यू झाला होता.
  • 14 सप्टेंबर 1997 – अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसचे पाच डबे मध्य प्रदेशातील बिलासपूरमध्ये नदीत पडून 81 जणांचा मृत्यू झाला होता.
  • 26 नोव्हेंबर 1998 – पंजाबमधील खन्ना येथे जम्मूतावी-सियालदह एक्स्प्रेसची फ्रंटियर गोल्डन टेंपल मेलच्या रुळावरून घसरलेल्या 3 डब्यांना धडक बसली होती. या अपघातात 212 जणांचा मृत्यू झाला होता.
  • 2 ऑगस्ट 1999 – बिहारमधील गैसल येथे अवध-आसाम एक्स्प्रेस आणि ब्रह्मपुत्रा मेलची धडक झाली होती. या अपघातात 268 जणांचा मृत्यू तर 359 जण जखमी झाले होते.
  • 2001 – केरळमधील कोझिकोडजवळील कडलुंडी नदीच्या रेल्वे पुलावर रेल्वेचा डबा रुळावरुन घसरला होता. या अपघातात 57 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर सुमारे 300 जण जखमी झाले होते.
  • 9 सप्टेंबर 2002 – राजधानी एक्सप्रेस धावे नदीच्या पुलावरील रुळावरुन घसरुन मोठा अपघात झाला होता. यात सुमारे 130 जणांना जीव गमवावा लागला होता. या अपघातामागे नक्षलवाद्यांचा हात असल्याचे उघड झाले होते.
  • 14 डिसेंबर 2004 – जम्मू तावी एक्स्प्रेस आणि जालंधर-अमृतसर रेल्वेची समोरासमोर धडक झाली होती. पंजाबमधील होशियारपूरजवळ हा अपघात झाला. या अपघातात 39 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
  • 29 ऑक्टोबर 2005 – हैद्राबादजवळील वेलीगोंडा येथे असलेला एक छोटा पूल अचानक आलेल्या पुरामुळे वाहून गेला. यामुळे रेल्वे पाण्यात पडून 114 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 हून अधिक लोक जखमी झाले होते.
  • डिसेंबर 2006 – हावडा जमालपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसचा 150 वर्षे जुना ओव्हर ब्रिज कोसळल्याने मोठा अपघात झाला होता. यात सुमारे 30 जणांना जीव गमवावा लागला होता.
  • 28 मे 2010 – हावडा लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला ज्ञानेश्वरी सुपर डिलक्स एक्स्प्रेस पश्चिम मिदनापूरमधील खेमाशुली आणि सरदिहा दरम्यान स्फोटामुळे रुळावरून घसरली होती. यानंतर मध्यरात्री मालगाडीने धडक दिल्याने 170 जणांचा मृत्यू झाला होता.
  • 7 जुलै 2011 – उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्याजवळ छपरा-मथुरा एक्स्प्रेसची बसला धडक बसली होती. या अपघतामध्ये 69 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
  • 2012 – हे वर्ष भारतीय रेल्वेच्या इतिहासातील रेल्वे अपघातांच्या दृष्टीने सर्वात वाईट वर्ष म्हणून ओळखले जाते. या वर्षी 14 अपघात नोंदवले गेले होते. यात रुळावरून घसरणे आणि समोरासमोर धडक होणे यांचा अशा अपघातांचा समावेश होता. यात शेकडो प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
  • 30 जुलै 2012 – दिल्ली-चेन्नई तामिळनाडू एक्स्प्रेसच्या डब्याला नेल्लोरजवळ आग लागली होती. यात 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
  • 26 मे 2014 – उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर भागात, गोरखधाम एक्स्प्रेस खलीलाबाद स्थानकाजवळ थांबलेल्या मालगाडीला धडकली होती. यात 25 जणांचा मृत्यू झाला होता तर 50 हून अधिक जखमी झाले होते.
  • 20 मार्च 2015 – डेहराडूनहून वाराणसीला जाणाऱ्या जनता एक्स्प्रेसचा मोठा अपघात झाला होता. उत्तर प्रदेश येथील रायबरेलीच्या बचरावन रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेचे इंजिन आणि दोन शेजारील डबे रुळावरून घसरल्याने 30 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे 150 जण जखमी झाले होते.
  • 20 नोव्हेंबर 2016 – इंदूर-पाटणा एक्स्प्रेस कानपूरमधील पुखरायनजवळ रुळावरून घसरली होती, या अपघातामध्ये 150 प्रवाश्यांचा मृत्यू झाला होता. तर 150 हून अधिक जखमी झाले होते.
  • जानेवारी 2017: आंध्र प्रदेशात प्रवासी रेल्वेचे डबे रुळावरून घसरल्याने 41 जणांचा मृत्यू झाला होता.
  • 19 ऑगस्ट 2017 – हरिद्वार – पुरी कलिंग उत्कल एक्स्प्रेसला उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील खतौलीजवळ अपघात झाला होता. यात रेल्वेचे 14 डबे रुळावरून घसरून 21 प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर 97 जण जखमी झाले होते.
  • 23 ऑगस्ट 2017 – उत्तर प्रदेशातील औरैयाजवळ दिल्लीला जाणाऱ्या कैफियत एक्स्प्रेसचे 9 डबे रुळावरून घसरले होते. यात किमान 70 जण जखमी झाले होते.
  • ऑक्टोबर 2018: अमृतसरमध्ये रुळांवर जमलेल्या गर्दीला रेल्वेने धडक दिल्याने 59 जणांचा मृत्यू झाला होता.
  • 13 जानेवारी 2022 – पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथे बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले होते. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला होता तर 36 जण जखमी झाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube