मोठी बातमी! नक्षलवाद संपवण्याच्या मोहिमेत सरकारला मोठं यश, 75 तासांत 303 नक्षलींचे आत्मसमर्पण

देशात 1967 सालापासून नक्षलवादी चळवळ पाहायला मिळते. आता याच नक्षलवादाचा प्रभाव कमी झाला आहे, असं केंद्र सरकारकडून सांगितले जात आहे.

  • Written By: Published:
Nakshali

केंद्र सरकारने देशातील नक्षलवाद येत्या 31 मार्च 2026 पर्यंत समूळ नष्ट करण्याचा संकल्प केला आहे. (Pune) त्यासाठी गृहमंत्रालयाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. काही ठिकाणी नक्षलवाद्यांच्या तळांवर हल्ले केले जात आहेत. तर, काही नक्षलींचे प्रबोधन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणले जात आहे. याच मोहिमेसंदर्भात केंद्र सरकारने मोठा दावा केला आहे. आता नक्षलवाद फक्त 11 जिल्ह्यांपुरता मर्यादित राहिला आहे, असं सरकारने सांगितलं आहे. तसंच, लवकरच आम्ही नक्षलवादाला संपवू असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे.

देशात 1967 सालापासून नक्षलवादी चळवळ पाहायला मिळते. आता याच नक्षलवादाचा प्रभाव कमी झाला आहे, असं केंद्र सरकारकडून सांगितले जात आहे. नुकतेच केंद्र सरकारने एक रिपोर्ट सार्वजनिक केला आहे. या रिपोर्टमध्ये सरकारने अनेक दावे केले आहेत. याच दाव्यांवर भाष्य करणारा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये अगोदर नक्षलवादाचा प्रभाव असणारे जिल्हे आणि आता नक्षलवादाचा प्रभाव असलेले जिल्हे दाखवण्यात आले आहेत.

मोठी बातमी! नक्षल कमांडर भूपतीने आत्मसमर्पण करताच गडचिरोली पोलिसांना एक कोटींच बक्षीस जाहीर

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 75 तासांत देशात 303 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. 2014 सालाच्या अगोदर 182 जिल्ह्यांमध्ये नक्षलवादाचा प्रभाव होता. आता ही संख्या फक्त 11 जिल्ह्यांपर्यंत राहिली आहे. गृहमंत्रालयाच्या दाव्यानुसार 2014 साली 330 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नक्षली हिंसेच्या घटना घडल्या होत्या. आता ही संख्या फारच कमी झाली आहे. अगोदर 18 हजार वर्ग किलोमीटरपर्यंत नक्षलवादाचा प्रभाव होता. आता तो फक्त 4200 वर्ग किलोमीटरपर्यंत शिल्लक राहिलेला आहे.

2004 ते 2014 या काळात एकूण 16,463 नक्षली हिंसेच्या घटना घडल्या होत्या. आता ही संख्या 2014 ते 2025 पर्यंत 53 टक्क्यांनी कमी होऊन 7,744 पर्यंत कमी झालेली आहे. दरम्यान, 1967 साली पश्चिम बंगालमधील नक्षलबाडी या ठिकाणाहून नक्षलवादाची चळवळ सुरू झाली. नंतर हे आंदोलन संपूर्ण देशभरात पोहोचले असे सांगितले जाते. नंतरच्या काळात ही चळवळ छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगाणा या राज्यांपर्यंत पसरली होती. बिहार तसेच उत्तर प्रदेशच्या काही जिल्ह्यांमध्येही नक्षलवाद पसरला होता. आता मात्र नक्षलवादाचे प्रभावक्षेत्र कमी झाल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

follow us