केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा; 2026-27 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प होणार सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण रविवारी, 1 फेब्रुवारी 2026 रोजी आर्थिक वर्ष 2026-27 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार.

  • Written By: Published:
Untitled Design (219)

Central government announces budget session : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंटरी अफेअर्सच्या बैठकीत संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखांना मंजुरी देण्यात आली आहे. संसदीय दिनदर्शिकेनुसार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण रविवारी, 1 फेब्रुवारी 2026 रोजी आर्थिक वर्ष 2026-27 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अलीकडच्या काळात रविवारी अर्थसंकल्प मांडण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारीपासून सुरू होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने त्याची सुरुवात होईल. त्यानंतर 29 जानेवारी रोजी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाणार असून, यातून अर्थसंकल्पापूर्वी देशाच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा मांडला जाईल.

यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील संसदीय कामकाज 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान होईल. त्यानंतर दुसरा टप्पा 9 मार्चपासून सुरू होऊन 2 एप्रिलपर्यंत चालेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी 2026 रोजी देशाचा 88 वा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2017 पासून सकाळी 11 वाजता 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा सुरू झाली आहे. त्यापूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प 28 फेब्रुवारी रोजी मांडला जात होता. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कार्यकाळात ही तारीख बदलण्यात आली होती.

महापालिकेचं रणांगण तापलं! महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस अहिल्यानगरच्या मैदानात

यंदाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर निर्मला सीतारमण सलग नऊ वेळा केंद्रीय अर्थसंकल्प मांडणाऱ्या अर्थमंत्री ठरणार आहेत. याआधी माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी दोन कार्यकाळात एकूण दहा वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. तर पी. चिदंबरमन यांनी नऊ वेळा आणि प्रणव मुखर्जी यांनी आठ वेळा केंद्रीय अर्थसंकल्प मांडला आहे. यापूर्वी 2025 मध्ये निर्मला सीतारमण यांनी शनिवारी अर्थसंकल्प सादर केला होता. त्याआधी 2015 आणि 2016 मध्ये माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 28 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडला होता आणि त्या दोन्ही वर्षी तो दिवस शनिवार होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात निर्मला सीतारमण यांच्याकडे अर्थमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी सातत्याने केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांच्याकडे अर्थ खात्याचा पूर्णवेळ कार्यभार देण्यात आला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातही निर्मला सीतारमण या देशाच्या अर्थमंत्री म्हणून कार्यरत आहेत.

follow us