आय. स्क्वेअर आयटी महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली शिवरायांच्या आदर्शांची शपथ
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त वैचारिक आणि प्रेरणादायी असा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
On the occasion of Shiv Jayanti, students took oath on the ideals of Chatrpati Shivaji maharaj : हिंजवडी येथील आय. स्क्वेअर आयटी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त वैचारिक आणि प्रेरणादायी असा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी इतिहासातील पराक्रम, नेतृत्वगुण आणि आदर्श जीवनमूल्ये यांची उजळणी करत शिवजयंती केवळ उत्सव म्हणून नव्हे तर विचारांचा आणि संस्कारांचा सोहळा म्हणून साजरी केली.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित विविध प्रेरणादायी भाषणे सादर केली. या भाषणांमधून महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी, स्वराज्याची संकल्पना आणि सर्वसमावेशक प्रशासन यांचा उल्लेख करत आजच्या तरुणांनी त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांचे दर्शन घडवणारा प्रभावी नाट्यप्रयोग सादर केला. या नाट्यप्रयोगातून स्वराज्य स्थापनेचा संघर्ष, मातोश्री जिजाबाई यांनी दिलेले संस्कार, तसेच अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या अभिनयाने उपस्थितांना शिवकालीन इतिहासाची जणू प्रत्यक्ष अनुभूती दिली.
Women’s Day : पुरुषांच्या वर्चस्वात इतिहास घडवून भारतरत्न मिळवणाऱ्या 5 महिलांची कहाणी
कार्यक्रमातील सर्वात प्रेरणादायी आणि लक्षवेधी क्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी घेतलेली सामूहिक शपथ ठरली. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारण्याचा संकल्प केला. समाजात सदाचार, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा जपण्याबरोबरच वाईट सवयी व व्यसनांपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली. तसेच महाराजांच्या आदर्शांप्रमाणे स्त्रियांच्या सन्मानाचे रक्षण करणे, समाजात बंधुता आणि समता टिकवून ठेवणे आणि देशभक्तीची भावना जोपासणे यासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.
या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, प्राध्यापकवर्ग तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ भूतकाळापुरता मर्यादित नसून तो आजच्या तरुणांसाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारांमधून स्वाभिमान, शिस्त, धैर्य आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होते. त्यामुळे अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला नवी दिशा मिळते.
उपस्थित मान्यवरांनीही मत व्यक्त करत सांगितले की, आधुनिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांची जपणूक होणे अत्यंत आवश्यक आहे. शिवजयंतीसारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि आदर्श जीवनमूल्यांची जाणीव अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. एकूणच, आय. स्क्वेअर आयटी महाविद्यालयात साजरी झालेली ही वैचारिक शिवजयंती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली. इतिहासातून प्रेरणा घेत वर्तमान घडवण्याचा आणि भविष्यासाठी सज्ज होण्याचा संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाला.
