राज्यसभेवर आठवलेंची हॅटट्रिक! किती आहे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची संपत्ती?

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सादर केलेल्या ऍफिडेव्हिटमध्ये त्यांच्या मालमत्तेचा आणि कर्जाचा तपशील समोर आला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 149

How much is the wealth of Union Minister of State Ramdas Athawale? : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मार्च 2026 मध्ये सलग तिसऱ्यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीकडून उभ्या करण्यात आलेल्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून त्यामध्ये रामदास आठवले यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे आठवले यांनी राज्यसभेवर निवडून येण्याची हॅट्ट्रिक केली आहे. यापूर्वी ते 2014 आणि 2020 मध्ये देखील राज्यसभेवर निवडून गेले होते.

या निवडणुकीत भाजपने आपल्या कोट्यातील एक जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाठी सोडली होती. त्यामुळे रामदास आठवले यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. त्यांचा नवीन कार्यकाळ एप्रिल 2026 पासून सुरू होणार असून तो 2032 पर्यंत असेल. राज्यसभेवर निवडून येताना उमेदवारांना आपली मालमत्ता आणि देणी यांची माहिती प्रतिज्ञापत्रात द्यावी लागते. त्यानुसार रामदास आठवले यांनी सादर केलेल्या ऍफिडेव्हिटमध्ये त्यांच्या मालमत्तेचा आणि कर्जाचा तपशील समोर आला आहे.

प्रतिज्ञापत्रानुसार रामदास आठवले यांच्या नावावर रोख स्वरूपात 85 हजार 745 रुपये आहेत. तर त्यांच्या पत्नीच्या नावावर 1 लाख 52 हजार 388 रुपये इतकी रोख रक्कम आहे. बँक खात्यांबाबत पाहिले तर आठवले यांच्या नावावर विविध बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात ठेवी आहेत. दिल्ली येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत त्यांच्या खात्यात 62 लाख 11 हजार 288 रुपये इतकी रक्कम आहे. त्याशिवाय मुंबईतील मॅडम कामा रोड शाखेत असलेल्या दुसऱ्या खात्यात 7 लाख 42 हजार 844 रुपये आहेत. याच शाखेतील एका खात्यात 2 हजार 657 रुपये आहेत. मंत्रालयातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत 50 हजार 294 रुपये असून कांदिवली येथील सारस्वत बँकेत 30 हजार 153 रुपये आहेत.

अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम भारतासाठी लकी की अनलकी? आतापर्यंतचे आकडे काय सांगतात?

रामदास आठवले यांच्या पत्नीच्या नावावर देखील विविध बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ठेवी आहेत. बांद्रा येथील सारस्वत बँकेत 1 लाख 39 हजार 522 रुपये आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, बांद्रा शाखेत तब्बल 66 लाख 4 हजार 547 रुपये जमा आहेत. कॅनरा बँक, बांद्रा येथे 18 हजार 421 रुपये असून एचडीएफसी बँक, बांद्रा शाखेत 16 लाख 45 हजार 671 रुपये आहेत. युनियन बँकेच्या चालू खात्यात 10 हजार रुपये आहेत.

या सर्व बँक ठेवी आणि रोख रक्कम मिळून सुमारे 1 कोटी 57 लाख रुपयांची चल मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. चल मालमत्तेबरोबरच आठवले यांच्या नावावर स्थावर मालमत्ता देखील आहे. सध्याच्या बाजारमूल्यानुसार त्यांच्या मालकीच्या किंवा त्यांच्या हिस्स्यातील मालमत्तेची किंमत सुमारे 5 कोटी 96 लाख 81 हजार 763 रुपये इतकी असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

मात्र मालमत्तेबरोबरच काही देणी देखील असल्याचे या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले आहे. खाजगी व्यालतींना मिळून त्यांच्यावर एकूण 96 लाख रुपयांचे कर्ज असल्याचे नमूद करण्यात आले आहे. चिंतन कॉम्प्युटर कन्सल्ट यांना 8 लाख रुपये, दिनेश श्रीवास्तव यांना 2 लाख रुपये, ज्योती श्रीवास्तव यांना 1 लाख रुपये, मीना बाजार यांना 75 लाख रुपये, राकेश श्रीवास्तव यांना 5 लाख रुपये आणि रश्मी कन्स्ट्रक्शन यांना 5 लाख रुपये अशी देणी आहेत.

या सर्व तपशिलाचा विचार केला असता रामदास आठवले यांच्या नावावर सुमारे 7 कोटी 50 लाख रुपयांच्या आसपास एकूण मालमत्ता आहे. त्यामध्ये सुमारे 5.96 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आणि सुमारे 1.57 कोटी रुपयांची चल मालमत्ता समाविष्ट आहे. दरम्यान सलग तिसऱ्यांदा राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यामुळे रामदास आठवले यांचा संसदीय प्रवास आणखी बळकट झाला आहे. एप्रिल 2026 पशु सुरू होणाऱ्या नव्या कार्यकाळात ते पुढील सहा वर्षे राज्यसभेत प्रतिनिधित्व करणार आहेत.

follow us