Congress : उमेदवार देण्याच्या वल्गना अन् ऐनवेळी बॅकफूटवर; काँग्रेसचा ‘पंजा’ नेमका कुणाच्या दबावात?

Maharashtra Congress 'उमेदवार देणार-देणार' म्हणत ऐनवेळी माघार घेण्याची काँग्रेसची भूमिका सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Congress: उमेदवार देण्याच्या वल्गना अन् ऐनवेळी बॅकफूटवर; काँग्रेसचा 'पंजा' नेमका कुणाच्या दबावात?

Congress: उमेदवार देण्याच्या वल्गना अन् ऐनवेळी बॅकफूटवर; काँग्रेसचा 'पंजा' नेमका कुणाच्या दबावात?

Why Maharashtra Congress On Back Foot Every Time : राज्याच्या राजकारणात सध्या काँग्रेसच्या ‘यू-टर्न’ घेण्याच्या भूमिकेमुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “उमेदवार देणार, लढा देणार” अशी आक्रमक भाषा सुरुवातीला वापरायची आणि अर्ज भरण्याच्या काही तास आधी अचानक माघार घेत मित्रपक्षाच्या उमेदवाराच्या गळ्यात माळ घालायची, हा काँग्रेसचा नवीन पायंडा पडताना दिसत आहे. बारामती पोटनिवडणुकीपासून सुरू झालेला हा सिलसिला आता विधान परिषद निवडणुकीपर्यंत कायम राहिल्याने काँग्रेसच्या रणनीतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेवटच्या क्षणी घेतलेल्या माघारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असला तरी, काँग्रेसचा ‘पंजा’ नेमका कुणाच्या दबावात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काँग्रेसच्या ‘बॅकफूट’ राजकारणाचे घटनाक्रम

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेत आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी (9 एप्रिल 2026) काँग्रेसने माघार घेतली. यावेळी माघारीचे कारण अजित पवारांचे निधन असे भावनिक देण्यात आले.

त्यानंतर आज (दि.30) विधान परिषदेच्या 9 जागांसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दानवेंना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेस आपला उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, अर्ज भरण्याची वेळ जवळ येताच सपकाळांनी ‘महाविकास आघाडीची एकता’ जपण्याचे कारण पुढे करत अंबादास दानवेंच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला. हाच प्रकार बारामती पोटनिवडणुकीतही घडला होता, जिथे शेवटच्या क्षणी माघार घेत सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा करण्यात आला होता.

काँग्रेस बॅकफूटवर जाण्याची इनसाईड’ कारणं

बारामती आणि आता विधान परिषद या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसने ऐनवेळी घेतलेल्या माघारीमागे तीन मुख्य राजकीय गणिते असू शकतात. ज्यात पहिले कारण म्हणजे महाविकास आघाडीमध्ये आजही निर्णयांची सूत्रे शरद पवारांकडेच असल्याचे काँग्रेसच्या माघारीवरून स्पष्ट होते. आघाडीत फूट पडू नये आणि भाजपला फायदा होऊ नये, यासाठी पवारांच्या ‘मध्यस्थी’मुळे काँग्रेसला नमती भूमिका घ्यावी लागल्याची चर्चा आहे. दुसरं कारण म्हणजे विधान परिषदेत विजयासाठी आवश्यक असलेले संख्याबळ काँग्रेसकडे स्वतःच्या बळावर नसल्याने, स्वतःचा उमेदवार पाडण्यापेक्षा मित्रपक्षाच्या विजयाचे श्रेय घेणे काँग्रेसला सुरक्षित वाटले असावे आणि तिसरं आणि महत्त्वाचे कारण म्हणजे छोट्या निवडणुकांत माघार घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसने स्वतःचा ‘बळी’ दिला असावा, अशी शक्यता काही राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

माघारीचा फटका बसण्याची शक्यता

आता ही झाली माघार घेण्याची कारण पण, माघारीचा हा फटका पक्षाला बसू शकतो. कारण, लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीत काँग्रेस राज्यात स्वतःला ‘मोठा भाऊ’ म्हणून मिरवत असला, तरी सातत्याने घेतलेली माघार पक्षाच्या प्रतिमेसाठी घातक ठरू शकते. पक्षाच्या या धरसोडीच्या वृत्तीमुळे ग्राऊंड लेव्हलवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची होत असून “जर निवडणूक लढवायचीच नव्हती, तर उभे राहण्याच्या वल्गना कशासाठी?” असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात उपस्थित होत आहे. याशिवाय स्वबळावर लढण्याऐवजी सातत्याने मित्रपक्षांवर अवलंबून राहिल्याने काँग्रेसचा राज्यातील स्वतंत्र विस्तार थांबण्याची भीतीदेखील काही जाणकार व्यक्त करत आहेत.

एकूणच, काँग्रेसची ही ‘बॅकफूट’वर जाण्याची वृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीच्या मोठ्या रणसंग्रामाची तयारी आहे की, मित्रपक्षांच्या दबावापुढे पत्करलेली शरणागती, हे येणारा काळच ठरवेल. जर या माघारीचा बदला म्हणून आगामी जागावाटपात काँग्रेसला झुकते माप मिळाले, तर ही ‘रणनीती’ यशस्वी मानली जाईल. मात्र, वारंवार अशा प्रकारे माघार घेतल्यास पक्षाची ‘बार्गेनिंग पॉवर’ कमी होऊन मित्रपक्ष काँग्रेसला गृहीत धरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Exit mobile version