Sanjay Shirsat News : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत खळबळजनक दावा केला आहे. बंड करण्याआधी शिंदे मातोश्री बंगल्यावर येऊन रडले होते, असे ठाकरे यांनी म्हटले होते. त्यांच्या या दाव्यावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिरसाट म्हणाले, ‘मला वाटतं आदित्य साहेबांनी जो दावा केला आहे की शिंदे मातोश्रीवर यायचे आणि रडायचे, त्यापैकी रडायचे हे शब्द त्यांनी चुकीचे वापरले आहेत. आम्ही सर्वच जण उद्धव ठाकरे सतत भेटत असायचो. आम्ही त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला या आघाडीत रहायचे नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले आम्हाला त्रास देतात, सहकार्य करत नाहीत, हे आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितले होते.’
Ambadas Danve : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून दानवेंनी शिंदे-फडणवीसांना सुनावले
‘शिंदे हे जरुर गेले असतील पण, आपण आघाडीतून बाहेर पडावं हे सांगण्यासाठी. आमदारांचीही तशीच इच्छा होती. आम्हीही शिंदेंना तसेच सांगितले होते. शिंदे साहेबांनीही तसेच सांगितले. बाकी रडले वगैरे बोलायचे ही त्यांची (आदित्य ठाकरे) स्टाइल असावी बाकी काही नाही’, असे शिरसाट म्हणाले.
आदित्य ठाकरेंचा दावा काय ?
शिवसेनेचे नेते (ठाकरे गट) आदित्य ठाकरे व खासदार प्रियांका चतुर्वेदी या हैदराबाद विद्यापीठामध्ये एक दिवसाच्या दौऱ्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ‘एकनाथ शिंदे यांना केंद्रीय एजन्सीकडून अटकेची शक्यता होती. या भीतीने ते मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपबरोबर चला असे सांगत होते’, असा गौप्यस्फोट ठाकरे यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बंडखोरी, हिंदुत्व, काँग्रेसबरोबर ठाकरे का गेले ? असा प्रश्न विद्यार्थ्याने विचारला होता. त्याला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, ‘चाळीस लोक हे पैशांसाठी आम्हाला सोडून गेले होते. एकदिवस एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर आले होते. केंद्रीय एजन्सीकडून अटक होऊ शकते असे सांगून ते रडू लागले होते. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले’, असे ठाकरे यांनी म्हटले.