Maharashtra Politics : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह चाळीस आमदारांच्या मदतीने भाजपने (BJP) राज्यात बंड घडवून आणलं आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. या घटनेला एक वर्ष उलटून गेलं आहे. मात्र अजूनही हे बंड नेमकं घडलं कसं?, कुणालाच याची कुणकुण कशी लागली नाही?, असे प्रश्न आजही विचारले जातात. आता मात्र भाजपचेच मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी या ऑपरेशनबाबत एकामागोमाग एक धक्कादायक खुलासे केले आहेत.
‘दैनिक लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई ते सूरत आणि सूरत ते गुवाहाटी या प्रवासा दरम्यान पडद्यामागे काय घडामोडी घडल्या याचा उलगडा केला. या मुलाखतीत चव्हाण म्हणाले, या ऑपरेशनचे प्लॅनिंग जबरदस्त होते. आमदार अंगावरील कपड्यांनिशी सुरतला पोहोचले होते. सूरतला गेल्यावर त्यांना कळले की येथे बरेच दिवस थांबावे लागणार आहे. त्यानंतर त्यांनी कपडे आणि अंतर्वस्त्रे खरेदी केली.
Rahul Gandhi : संविधानावर भाजपसह संघाचं आक्रमण, विरोधकांच्या बैठकीतून राहुल गांधी बरसले…
बंडाचं प्लॅनिंग दिल्लीत
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न याआधी दोन वेळा झाले होते. 2019 मध्ये प्रयत्न केला मात्र तांत्रिक अडथळा आल्याने तो प्रयत्न फसला. त्यानंतर पुन्हा 2021 मध्ये प्रयत्न केला गेला. पण, वरिष्ठांनी परवानगी दिली नाही म्हणून प्लॅनिंग रद्द करावे लागलेय. नंतर जून 2022 मध्ये मात्र नियोजन यशस्वी ठरले. यावेळी व्यवस्थित प्लॅनिंग केले गेले. त्यामुळे प्रयत्नांना यश मिळाले.
फडणवीस मार्गदर्शक, शिंदेंनी सूचना पाळल्या
या बंडात 40 आमदार सुरुवातीपासूनच सोबत होते. त्यांना टप्प्याटप्प्याने बाहेर काढण्याचे नियोजन होते. जे काही घडलं, ते दिल्लीतून घडलं. त्याचे मार्गदर्शक देवेंद्र फडणवीस होते. त्यांच्याच नियोजनानुसार हे ऑपरेशन पार पडले. एकनाथ शिंदेंनी या बंडाची आणि भाजपसोबत सुरू असलेल्या वाटाघाटींची माहिती त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांनाही दिली नव्हती. कारण गुप्तता राखण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचना त्यांनी तंतोतंत पाळल्याचे चव्हाण म्हणाले.
पाटण्यातून उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल, ‘हुकूमशाहीच्या विरोधात लढू’
ते 20 आमदारही आमच्यासोबत
महाविकास आघाडीतील आणखी 20 आमदार आमच्यासोबत यायला तयार होते. आता जरी ते महाविकास आघाडीत असले तरी मनाने युतीसोबत आहेत, असा दावा चव्हाण यांनी केला.
सूरतला पोहोचेपर्यंत सगळेच गाफील
या बंडात सोबत असलेल्या आमदारांना ते सूरतपर्यंत कोणत्या वाहनात बसले, सोबत कोण आहे, वाहनाचा चालक कोण आहे याची काहीच माहिती नव्हती. इतकेच नाही तर चालकालाही माहिती नव्हतं की वाहनात कोण बसलं आहे. कुणी वेशांतर करून तर कुणी पोलिसांच्या बंदोबस्तात वसईमार्गे सुरतला पोहोचल्याचे चव्हाण म्हणाले.