प्रफुल्ल साळुंखे
( विशेष प्रतिनिधी )
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पवार यांच्यानंतर पक्षाचा अध्यक्ष कोण, यावर एक समिती निर्णय घेईल अस सांगत या समितीची घोषणा ही शरद पवार यांनी करुन टाकली. पवार या घोषणेवरून माघार घेणार नाहीत अशीच शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत गट तट पहिले तर सर्वसंमतीने पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष सुप्रिया सुळे याच होतील यात काडीमात्र शंका नाही.
शरद पवार यांच्यानंतर पक्षाची धुरा ही सर्वसंमतीने एका नेत्याकडे दिली जावी असं शरद पवार यांनी जाहीर केलं. पण पक्षात असलेले गट एकमेकांना साथ देणार नाहीत हे खुद्द शरद पवार यांना देखील माहीत आहे.
पक्षात अजित पवार , सुप्रिया सुळे, जयंत पाटील , छगन भुजबळ , दिलीप वळसे या प्रत्येकाने आपापल्या परीने गट तयार केले आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वात हे सर्व गट एकत्र राहू शकतात. पण एरव्ही या नेत्यांमध्ये कमालीची स्पर्धा आहे आणि ती लपून राहिलेली नाही. पक्षात राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी एकाचे नाव सुचवले की दोन गट विरोध करतील अशीच स्थिती आहे. त्यामुळे एक नावावर शिक्कामोर्तब होणे कठीण आहे. शेवटी जर सुप्रिया सुळे यांचे नाव जाहीर झाले तर जयंत पाटील, अजितदादा आणि छगन भुजबळ या सर्वांना या नवावर पसंती द्यावी लागेल.
सुप्रिया सुळेंकडे पक्ष सोपवण्याचा पवारांचा प्लान? मित्राकडूनच मोठा दावा
जयंत पाटील, अजित पवार यांच्यापेक्षा सुप्रिया सुळे हे सर्वसमावेशक नाव असेल यावर एकमत होऊ शकते. पवार यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष झाल्या तर ज्या अडचणी आव्हाने सुप्रिया सुळे यांच्या समोर येतील ती शरद पवार स्वतः हाताळू शकतात. जोपर्यंत शरद पवार आहेत तोपर्यंत त्यांना पक्षाची घडी बसवण्याची संधी मिळेल. एखादा निर्णय चुकीचा ठरला तर त्याला दुरुस्त करण्याची संधी मिळेल.
आता पक्षाचा अध्यक्ष बदलण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचे पक्षातील अनेक नेत्यांना खासगीत वाटतं. जर आता पक्षाला नवा अध्यक्ष दिला तर त्याला पक्ष सांभाळण्याची सवय होईल. जर शरद पवार नसताना अध्यक्ष पदावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट तर पडेल पण पक्षातील अनेक नेत्यांचे गट स्वतंत्रपणे बाहेर पडतील. ज्या पद्धतीने शिवसेनेची अवस्था झाली तीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊ शकते. अशी अनेकांना भीती वाटते.
Ashok Chavan : पवारांनी निवृत्तीची घोषणा करणं हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय
आताच अध्यक्ष झाला तर पक्षात शरद पवार यांचे प्रत्यक्ष लक्ष राहील. एखाद्या मोठ्या घटनेत ते मध्यस्थी करू शकतील पण ते नसताना पक्षात फूट अटळ आहे. अस पक्षातील अनेक पदाधिकारी बोलून दाखवत होते. सुप्रिया सुळे या केंद्रीय अध्यक्ष झाल्यास राज्याची जबाबदारी सहाजिकच अजित पवार यांच्याकडे येणार हे स्पष्ट आहे. यदा कदाचित महाविकास आघाडी सत्तेत आली अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपासोबत गेला तर पक्षाच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार हे अजित पवार असतील हे नक्की आहे.
पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी नवीन येणाऱ्या अध्यक्षाचा कारभार हा पवारांच्या देखरेखी खालीच चालेल हे तितकेच खरे.