Rupali Chakankar : ज्यावेळी राज्यात महाविकास आघाडीकडे राज्य महिला आयोगाचे पद आले त्यावेळी या पदावर कुणाला नियुक्त करायचे ?, असा प्रश्न होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा मला पहिला फोन आला, असे वक्तव्य करत महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्तीचा खास किस्सा अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ऐकवला. ‘लेट्सअप सभा’ या विशेष कार्यक्रमात लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विविध मुद्द्यांवर आपली ‘मते व्यक्त केली.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा ज्यावेळी प्रश्न होता, आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती कशी झाली ?, त्यासाठी पहिला फोन कुणाचा आला ?, असा प्रश्न चाकणकर यांना विचारण्यात आला. त्यावर चाकणकर म्हणाल्या, ‘आयोगाचे अध्यक्षपद महाविकास आघाडीकडे आले. त्यावेळी मला पहिला फोन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आला. महिला आयोगाचे अध्यक्षपद तुला देतो, असे ते म्हणाले. सहाजिकच मला आनंद झाला मात्र थोडी भीतीही वाटली. कारण, आतापर्यंत मी संघटनेतील पदे भुषविली होती. महिला आयोगाचे अध्यक्षपद हे संवैधानिक पद आहे. त्यामुळे थोडी भीती वाटत होती.’
‘मी आयोगाची अध्यक्ष होण्याआधी प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते. या प्रदेशाध्यक्ष पदाच्या अडीच वर्षांच्या काळात महिलांचे संघटन केली. त्यांची एक बळकट फळी उभारण्याचे काम केले. त्यानंतर थेट महिला आयोगाचे अध्यक्षपद सांभाळण्याची जबाबदारी मिळाली. हे पद संवैधानिक आणि जबाबदारीचे पद आहे. संघटनेतील पदांकडून संवैधानिक पदांकडे वाटचाल सुरू होती, त्यामुळे थोडी धाकधूक वाटत होती.’
‘या पदावर काम करत असताना आपण न्यायालयीन प्रक्रियेत आहोत. एक प्रकारे न्यायाधीश म्हणूनच काम करणार आहोत. त्यामुळे हे एक आव्हानच होते. तरी देखील हे आव्हान पेलण्याची जबाबदारी मी स्वीकारली’, असे त्या म्हणाल्या.
उत्तम कारभार केला
महिला आयोगाच्या आतापर्यंतच्या दीड वर्षांच्या कार्यकाळात अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या. विशेष म्हणजे, मी अध्यक्ष झाल्यानंतर माझ्याकडे पहिली तक्रार पुरुषांची आली होती. आयोगाच्या दीड वर्षांच्या कार्यकाळात सतत महिलांना न्याय देण्याचीच भूमिका स्वीकारली. या पदाचा कार्यभार मी उत्तमपणे सांभाळला असेही चाकणकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
Ajit Pawar : ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यातील आपत्ती सरकार निर्मित, अजित पवारांचं सरकारला पत्र
माझ्यावर बारा गुन्हे
संघटनेत काम करत असताना अनेक वेळा गु्न्हे दाखल होण्याचाही प्रसंग आला. काही गुन्हे तर मी तालुकाध्यक्ष असल्या पासूनचे आहेत. तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष असे एकूण बारा गुन्हे माझ्यावर दाखल होते. मी या खटल्यांना प्रामाणिकपणे सामोरे गेले. आज आता अशी परिस्थिती आहे की मागच्या वर्षापर्यंत माझ्यावरील सगळे गुन्हे आता निल झाले आहेत. काही ठिकाणी आंदोलनाला परवानगी दिली नाही तर काही ठिकाणी परवानगी दिल्यानंतरही गुन्हे दाखल केले गेले होते, असे चाकणकर म्हणाल्या.