Maharashtra State Cooperative Bank employees will bring a substantial salary hike after 12th wage settlement : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे. 2026 ते 2031 या कालावधीचा 12 वेतन करार संपन्न झाला आहे. त्यानुसार आता राज्यातील सहकारी बँक कर्मचाऱ्यांना तब्बल 14 टक्के वाढ करण्यात आली आहे.
सेवकांच्या वेतनात 14 टक्के भरघोस वाढ; कुटुंब सुरक्षा कवच योजना व इतर भरघोस सुविधा
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा सन 2026 ते 2031 या कालावधीसाठीचा 12 वा ऐतिहासिक वेतन करार बुधवार, दि. 18 नोव्हेंबर 2026 रोजी राज्य बँकेच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात संपन्न झाला. या प्रसंगी को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री. आनंदराव अडसूळ व बँकेच्या एकूण 6 कर्मचारी संघटनांचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.
बाराव्या ऐतिहासिक सेवकांच्या वेतन कराराचे वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे :
1. सेवकांच्या मागील वेतन करारामध्ये 12% वाढ दिली होती. त्यामध्ये भरघोस वाढ करून यंदाच्या वेतन करारामध्ये 14 % इतकी लक्षणीय वाढ देण्यात आली आहे. यामुळे सेवकांच्या पगारामध्ये सरासरी रु. 15,500/- इतकी वेतनवाढ होत आहे.
2. या वर्षाच्या वेतन करारामधील वैशिष्ट्य म्हणजे सेवा कालावधीत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी बँकेने सुरू केलेली ‘कुटुंब सुरक्षा कवच योजना’ होय. या योजनेनुसार सेवा काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याला त्याच्या उर्वरित सेवेच्या प्रत्येक वर्षाला 2 महिन्यांच्या पगाराएवढी रक्कम त्याच्या कुटुंबाला देण्यात येईल. तसेच, त्याच्या घरातील पात्र व्यक्तीला बँकेच्या सेवेत घेण्याकरिता असलेली वयोमर्यादा 35 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली असून, स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना 20 % अधिक भारांक (वेटेज) देण्यात आले आहे.
3. या करारामध्ये प्रामुख्याने मेट्रोपॉलिटन सिटीसाठी रु. 5,500/- पर्यंत सिटी अलाऊन्स देण्यात आला आहे. तसेच कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या घरकर्ज व इतर कर्ज सुविधांच्या मर्यादांमध्ये भरघोस वाढ करण्यात आली आहे. बँकेने नुकतेच सेवकांना 14.25% बोनस देऊन त्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे.
या ऐतिहासिक कराराच्या प्रसंगी बोलताना को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी नमूद केले की, बँकेची प्रगती व कर्मचाऱ्यांची प्रगती या परस्परपूरक बाबी आहेत. बँकेच्या प्रगतीमध्ये सेवक संघटनांचा रचनात्मक सहभाग असावा. तसेच त्यांनी सेवकांना आवाहन करताना असे नमूद केले की, स्पर्धात्मक युगात कर्मचाऱ्यांनी आपली कार्यक्षमता, उत्पादकता, ग्राहक सेवेचा दर्जा सुधारणे तसेच डिजिटल बँकिंग प्रणाली आत्मसात करणे ही काळाची गरज आहे.
या प्रसंगी बोलताना बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी असे नमूद केले की, सेवकांचे पगार, त्यांच्या कुटुंबाची सुरक्षितता ही प्रशासनाची जबाबदारी आहे. परंतु याबरोबरच प्रशासनाने सेवकांना भरघोस वाढ दिल्यानंतर सेवकांनीदेखील त्यांच्याकडून अपेक्षित असणारी जबाबदारी पार पाडण्यात कसूर करू नये. तसेच बँकेच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देताना सेवकांनी कुठलीही कुचराई अथवा तडजोड करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.
