Download App

महात्मा गांधी जुन्या तर नरेंद्र मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता, अमृता फडणवीसांचं वादग्रस्त विधान…

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजपच्या नेत्यांकडून अनेकदा महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने करण्यात आली. त्यावरुन राज्यभरात विरोधकांकडून अनेक आंदोलने, मोर्चे, प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन असे अनेक मोर्चे निघाले. नुकताच महाविकास आघाडी सरकारकडून सत्ताधारी सरकारविरोधात विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचा अजेंडाच महापुरुषांबद्दल भाजपच्या नेत्यांकडून होत असलेली अवहेलना, अवमानकारक वक्तव्ये त्याचबरोबर एकमेकांशी तुलना भाजपच्या काही नेत्यांकडून करण्यात आली.

यामध्ये विशेषत: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, आमदार प्रसाद लाड, सुधांशू त्रिवेदी यांच्यासह इतर नेत्यांकडून महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्ये केल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारडून करण्यात आला. या विरोधात विविध संघटनांसह सर्व विरोधी पक्षांनी आवाज उठवून वादग्रस्ते वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

या प्रकरणावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये खडाजंगी सुरु असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी एक वादग्रस्त विधान केलंय. त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केलीय.

फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी राष्ट्रपिता मुद्यावरून केलेल्या विधानावरून आता नवा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी महात्मा गांधी यांच्या राष्ट्रपिता या मुद्यावरून केलेल्या व्यक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमृता फडणवीस यांनी एका कार्यक्रमात हे विधान केलंय. नागपूरमध्ये अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे अभिरुप न्यायालय आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी फडणवीस यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. या न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून अ‍ॅड. कुमकुम सिरपूरकर यांनी तर वकील म्हणून अजेय गंपावार आणि लिपिक म्हणून रश्मी पदवाड-मदनकर यांनी काम पहिले. या संस्थेच्या पहिल्या अध्यक्षा ताराबाई शास्त्रींच्या स्मृतिनिमित्त कार्यक्रम आयोजिला होता.

कार्यक्रमात अमृता फडणवीस यांचं भाषण झालं. यावेळी त्या म्हणाल्या, आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत. मी स्वत:हून कधीही राजकीय वक्तव्य करत नाही. मला त्यात रसही नाही. माझ्या वक्तव्यावर सामान्य लोक मला ट्रोल करीत नाहीत. राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे ते कल्पक असतात. त्यांना मी फारसे महत्त्व देत नाही आणि घाबरतही नाही.

मी फक्त माझ्या आई व सासूबाईंना घाबरते. मी जास्त बोलले तर माझे आणि देवेंद्र आम्हां दोघांचेही नुकसान होते, ही बाब मला आता कळून चुकली आहे. याचा फायदा अनेकांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून घेतला आहे. मी खूप बोलते, अशी तक्रार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे करण्यात आली होती हे खरे आहे. पण मी आहे तशी आहे. प्रतिमा तयार करण्यासाठी मी काहीही बदल केले नसल्याचं अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, आधीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले भाजपचे नेते आणि त्यात आता देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी केलेल्या विधानामुळे त्या वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags

follow us