Mahendra Thorve accuses Sunil Tatkare : गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात महायुतीतील अंतर्गत मतभेद सातत्याने समोर येत असून, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. सुनील तटकरे हे कंपन्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप थोरवे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या रोजगार आंदोलनावरून महायुतीतील हा संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे.
सुधाकर घारे यांच्या आंदोलनावर टीका करताना महेंद्र थोरवे यांनी हे आंदोलन स्थानिकांच्या रोजगारासाठी नसून स्वतःची झोळी भरण्यासाठी केलेली स्टंटबाजी असल्याचा आरोप केला. हा प्रकार नेमका कशासाठी करण्यात आला, हे लवकरच सर्वांच्या लक्षात येईल, असही थोरवे म्हणाले. खालापूर परिसरातील कंपन्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. स्थानिकांना रोजगार देण्याचे काम या कंपन्या करत असताना त्या बंद पाडण्याचा किंवा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा थोरवे यांनी सुनील तटकरे आणि सुधाकर घारे यांना दिला.
रायगडमधील महायुतीचा हा अंतर्गत संघर्ष नवीन नाही. यापूर्वी रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली होती. मंत्री भरत गोगावले आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यात पालकमंत्रीपदासाठी राजकीय चढाओढ असल्याची चर्चा होती. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने अनिकेत तटकरे यांना सहकार्य करत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर रायगडचे पालकमंत्रिपद भरत गोगावले यांच्याकडे गेल्याने या राजकीय घडामोडींना आणखी महत्व प्राप्त झाले.
ईडीला फक्त अंतरवालीचीच चौकशी करायची आहे का? ईडीच्या नोटिसांवरून जरांगेंचे फडणवीसांवर गंभीर आरोप
दरम्यान शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी देखील यापूर्वी अनिकेत तटकरे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली होती. अनिकेत तटकरे यांचा उल्लेख त्यांनी ‘सरोगसी बाळ’ असा करत, विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी अर्ज मागे घेतला नसता तर त्यांचा राजकीय जन्मच झाला नसता, अशी टीका केली होती. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले होते. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार सुनील तटकरे यांच्यातील चर्चेनंतर हा अर्ज मागे घेण्यात आला आणि अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
एकीकडे पालकमंत्रीपद आणि विधान परिषद निवडणुकीवरून निर्माण झालेला राजकीय तणाव अद्याप चर्चेत असतानाच आता रोजगार आंदोलनाच्या मुद्द्यावरून महेंद्र थोरवे यांनी थेट सुनील तटकरे आणि सुधाकर घारे यांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे रायगडमध्ये महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, आगामी काळात या आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार येण्याची शक्यता आहे.
