Download App

Maratha Reservation : आंदोलन चिघळले! CM शिंदेंनी दिले चौकशीचे आदेश

Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनला (Maratha Reservation) हिंसक वळण लागले. पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. यानंतर पोलिसांनी काही आंदोलकांची धरपकड करण्याचाही प्रयत्न केला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले आहेत. या प्रकरणी आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया देत आदेश दिले आहेत. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; फडणवीसांना घेरत पवार स्पष्टच बोलले

शिंदे म्हणाले, घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. मराठा समाजाच्या मागे पूर्ण सरकार ठाम उभे आहे. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळाले पाहिजे हीच सरकारची भूमिका आहे. मी स्वतः उपोषणकर्त्यांबरोबर चर्चा केली होती. संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचनाही दिल्या होत्या. अशा प्रकारची घटना होणं योग्य नाही. पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांशीही माझं बोलणं झालं आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणावर (Maratha Reservation) सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं यासाठी न्यायालयीन लढाई सुरू आहे. उपसमितीची वारंवार बैठक घेत आहेत. यामधून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिज आणि कोर्टातही टिकायला पाहिजे यासाठी सरकार काम करत आहे. पण, असं असताना दुर्दैवी प्रकार समोर आला. सरकार याची सखोल चौकशी करेल. या चौकशीतून खरे वास्तव समोर येईल, असे शिंदे म्हणाले. मराठा समाजातील समन्वयक आणि आंदोलकांनी शांतता राखावी. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, हा सर्वांचा उद्देश आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

नेमकं काय घडलं होतं ?

मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू झाले होते. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या तालुक्यातील वीस ते बावीस गावांमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. या आंदोलनाला पाठिंबा वाढू लागला होता. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अनेक गावांतही बंद पुकारण्यात आला. येथील तरुणांनी आंदोलनाच्या समर्थनार्थ सराटी गावांत दुचाकी रॅली काढण्यात आली होती.

जालन्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांचा लाठीचार्ज, आंदोलकांकडूनही दगडफेक

या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यांनी घेतली होती. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधला होता. परंतु जरांगे यांनी उपोषण मागे घेतले नाही. शुक्रवारी अनेक गावांतून पाठिंबा वाढू लागला होता. त्यामुळे शुक्रवारी पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोठा गोंधळ उडाला. संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी दगडफेक सुरू केली. तर पोलिसांनी प्रत्युत्तरात जोरदार लाठीचार्ज केला. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. यात काही पोलिस आणि आंदोलनकर्तेही जखमी झाले आहे.

Tags

follow us