येवला पालिकेत शिवसेना शिंदे गटाचे 10 पैकी 7 नगरसेवक भुजबळांच्या गोटात, किशोर दराडेंना मोठा धक्का

सामूहिक निर्णयामुळे येवला शहरातील राजकीय वातावरण चांगलच तापलं असून स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

Untitled Design 2

Untitled Design 2

Major setback for Shiv Sena in Nashik : नाशिक जिल्ह्यातील येवला नगरपालिकेच्या राजकारणात मोठी आणि नाट्यमय घडामोड घडली असून शिवसेनेकला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे 10 पैकी तब्ब्ल 7 नगरसेवकांनी शिक्षण किशोर दराडे आणि शिवसेना नेते कुणाल दराडे यांच्य कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत थेट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप युतीला पाठिंबा जाहीर केला आहे. या सामूहिक निर्णयामुळे येवला शहरातील राजकीय वातावरण चांगलच तापलं असून स्थानी राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

या सातही नगरसेवकांनी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थिती, विकासकामे आणि नगरसेवकांना भेडसावणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर नगरसेवकांनी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपला आपला जाहीर पाठिंबा देत राजकीय भूमिका स्पष्ट केली.

यावेळी बोलताना माजी खासदार समीर भुजबळ यांनी राज्यातील महायुतीच्या राजकारणाचा संदर्भ देत सांगितले की, राज्य पातळीवर सर्व घटक पक्ष एकत्र काम करत असले तरी स्थानिक स्तरावर मतभेद निर्माण होऊ शकतात. मात्र, शहराच्या विकासाला प्राधान्य देत सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. येवला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन काम करण्याची भूमिका त्यांनी मांडली.

पारा आणि शिसेयुक्त ‘गोरी ब्युटी क्रीम’मुळे कर्करोगासह गंभीर आजारांचा धोका; एफडीएने दिले कठोर आदेश

दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी देखील या घडामोडीमागील कारणांवर भाष्य केले. त्यांनी आरोप केला की, स्थानिक पातळीवर नगरसेवकांना सातत्याने डावलले जात होते. तसेच त्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष केले जात होते. नगरसेवकांच्या भावना आणि समस्या वेळोवेळी मांडून देखील त्यावर कोणतीही ठोस दखल घेतली गेली नसल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे देखील अशीच परिस्थिती कायम राहिली, तर सातही नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन पुन्हा जनतेच्या न्यायालयात जाण्यास तयार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला.

या बंदमुळे येवला नगरपालिकेतील सत्तेची समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या 10 नगरसेवकांपैकी 7 नगरसेवकांनी एकत्रितपणे वेगळी भूमिका घेतल्याने पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेषतः किशोर दराडे यांच्या नेतृत्वाला हा मोठा धक्का मानला जात असून येवला मतदारसंघातील आगामी राजकीय रणनीतीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घटना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. नगरपालिकेतील नगरसेवकांची फूट केवळ पक्षीय राजकारणापुरती मर्यादित नसून भविष्यातील आघाड्या, निवडणूक रणनीती आणि स्थानिक नेतृत्वाच्या प्रभावावरही त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. त्यामुळे येवला नगरपालिकेतील ही राजकीय घडामोड केवळ एका पक्षातील नाराजी म्हणून न पाहता, भविष्यातील राजकीय बदलांची नांदी म्हणून पाहिली जात आहे.

एकंदरीत, शिवसेना शिंदे गटामधील सात नगरसेवकांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे येवला शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून आगामी काळात आणखी कोणते राजकीय निर्णय आणि घडामोडी घडतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version