पुढचा दौरा शक्य नाही…उपोषणाचा 18वा दिवस, प्रकृती खालावली, मनोज जरांगेंनी केलं मोठं वक्तव्य

आरक्षण महत्त्वाचं आहे, दौरा महत्त्वाचा नाही. प्रकृतीचा त्रास वाढत असल्याने दौरा शक्य होत नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

Untitled Design   2026 09 16T075548.858

Untitled Design 2026 09 16T075548.858

Manoj Jarange makes a major statement : सलाईन घेतले की सरकार बिनधास्त होतं आणि सलाईन सोडली की मात्र टेन्शनमध्ये येतं. ज्याला कोणी वस्ताद नाही, ज्याला कोणी बाप नाही, त्याचा बाप आहे मी. चांगल्या चांगल्यांची जिरवली आहे. मात्र उपोषण सुरू असताना दौरा करणं योग्य नाही. आरक्षण महत्त्वाचं आहे, दौरा महत्त्वाचा नाही. प्रकृतीचा त्रास वाढत असल्याने पुढचा दौरा आता शक्य होत नाही, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे रात्री दोन वाजता झालेल्या सभेत ते बोलत होते.

मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले असून त्यांचा रात्रीचा मुक्काम पाटोदा येथे होता. नियोजित वेळेपेक्षा त्यांना पाटोद्यात पोहोचण्यास मोठा उशीर झाला. रात्री साधारण दीड वाजण्याच्या सुमारास ते पाटोद्यात दाखल झाले. एवढा उशीर होऊनही हजारो मराठा समाजबांधव आणि महिला त्यांच्या स्वागतासाठी व सभेसाठी उपस्थित होत्या. त्यानंतर रात्री दोन वाजण्याच्या सुमारास जरांगे यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.

आजचा प्रवास फार मोठा झाला. मी समाजाला आधीच सांगितलं होतं की तुम्ही येऊ नका, मला एकट्याला जायचं आहे. आज उपोषणाचा अठरावा दिवस आहे. सलाईन घेतल्यामुळे बरं वाटलं होतं; मात्र 12 तारखेला सलाईन सोडल्यानंतर पुन्हा त्रास सुरू झाला. आता हात-पाय हलवतानाही त्रास होत आहे. खोपोलीपर्यंत जायचं म्हणजे माणूस जेवण करून असला पाहिजे. त्यामुळे पुढचा दौरा आता शक्य होत नाही. मला दौरा रद्द करावा लागू शकतो, असे जरांगे पाटील म्हणाले.

महाराष्ट्रात सर्वाधिक कुणबी प्रमाणपत्रे ‘या’ जिल्ह्यात वितरित; स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

पश्चिम महाराष्ट्रातील आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारला सवाल केला. पश्चिम महाराष्ट्रात फळबागा आहेत, असं सरकार म्हणतं. मग त्या फळबागा ओबीसींकडे नाहीत का? मग त्यांना आरक्षण कशाला आहे? मी उपोषणात दौरा करू शकत नाही. पोटातली आग कमी झाली तर येईन, पण ती कमी झाली नाही तर कसा येऊ? असे ते म्हणाले.

मराठा आरक्षणासंदर्भातील नोंदींचा उल्लेख करताना जरांगे म्हणाले, 58 लाख नोंदी मिळाल्या आणि अडीच कोटी समाज आरक्षणात गेला. आता गॅझेटसाठी प्रयत्न सुरू आहेत. पेन ड्राइव्हमध्ये सगळ्या नोंदी घेतल्या आहेत. सरकारने काहीही केलं तरी त्या नोंदी आपल्या हातात आहेत. आपल्या हातात आता चेक आहे, तो आपण कधीही बँकेत टाकू शकतो. मराठे आता विजयाच्या उंबरठ्यावर आहेत, असा दावा त्यांनी केला.

समाजाला संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन करताना जरांगे म्हणाले, माझ्या समाजाच्या लेकराबाळांसाठी लढताना शरीर थकलं असेल; पण तुमच्यासाठी मी सरकारला अंगावर घेतलं आहे. मी घाबरलो नाही आणि खचलोही नाही. सरकारला वाटतं मी त्यांना शरण यावं; पण मागणी कशी सोडणार? सरकारपेक्षा माझा समाज मोठा आहे. माझा समाज कोणतेही सरकार पाडू शकतो आणि दुसरे सरकार आणू शकतो. मी मरेल, पण तुम्हाला मान खाली घालू देणार नाही.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ बदलणार; ‘या’ खेळाडूंना मिळणार संधी

प्रकृतीचा त्रास वाढत असल्याने आपल्या मागे वाहनांचा ताफा आणू नये, असे आवाहनही त्यांनी समर्थकांना केले. पाटोद्यातून एकही गाडी माझ्या मागे येऊ देऊ नका. तुम्हाला खोपोलीला जायचं असेल तर जा. मी मार्ग बदलून निघून जाईन आणि पोलिसांना सांगून मुंबईला जाईन. तुम्ही माझ्या मागे येणार असाल तर मी पुन्हा अंतरवालीला जाईन किंवा पाटोद्यातच उपोषण सुरू करेन, असे त्यांनी सांगितले.

मी माझ्या कुटुंबाला सांगून आलोय की स्वाभिमानाने जगा. मुलाला सांगितलं आहे, धाडसाने पुढे चला. मी समाजासाठी गेलो तर पुढचा गाडा चालव. जातीची प्रतिष्ठा कमी होऊ देऊ नका. एक बळी समाजासाठी जाऊ द्या, असेही जरांगे पाटील म्हणाले. याच सभेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपल्याला गोळ्या घालण्याचे षड्यंत्र रचल्याचा गंभीर आरोप केला.

Exit mobile version