बालपणीच्या मित्राने घेतली पंतप्रधान मोदींची भेट, आमदार नरेंद्र मेहतांनी सोडला वादग्रस्त भूखंडाचा ताबा
असगर अली वोरा यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीच्या बांधकाम कंपनीने भाईंदरमधील आपल्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप केला होता.
Prime Minister Modi’s friend Asghar Ali Vora : मुंबईतील मीरा रोड येथील 81वर्षीय असगर अली वोरा यांनी आपले शालेय मित्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीच्या बांधकाम कंपनीने भाईंदरमधील आपल्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप केला होता. या भेटीनंतर काही दिवसांतच या प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. मंगळवारी नरेंद्र मेहता यांनी वादग्रस्त जमिनीचा ताबा सोडत असल्याचे जाहीर केले. तसेच या भूखंडासाठी मिळालेली बांधकाम परवानगी परत करण्यासह वोरा यांच्याविरोधात यापूर्वी दाखल केलेली तक्रारही मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
असगर अली वोरा यांनी गुजरातमधील वडनगर येथील बी. एन. स्कूलमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासोबत शिक्षण घेतल्याचे सांगितले आहे. 8 सप्टेंबर रोजी त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेत या जमीन वादात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. वोरा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी 1989 मध्ये भाईंदर पूर्वेकडील नवघर परिसरात सुमारे 2,810 चौरस मीटर जमीन खरेदी केली होती. मात्र 2011 मध्ये स्वयं बिल्डर्स आणि मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन्सने या भूखंडाचा ताबा घेतल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या 15 वर्षांपासून विविध सरकारी यंत्रणांकडे या प्रकरणाचा पाठपुरावा करत असल्याचेही वोरा यांनी सांगितले. पंतप्रधानांसोबत झालेल्या भेटीत आपल्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा दावा त्यांनी केला होता.
पुढचा दौरा शक्य नाही…उपोषणाचा 18वा दिवस, प्रकृती खालावली, मनोज जरांगेंनी केलं मोठं वक्तव्य
या भेटीनंतर सरकारी पातळीवरही प्रकरणाची दखल घेण्यात आली. मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांच्या उपस्थितीत यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला असगर अली वोरा, आमदार नरेंद्र मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा आणि नगररचनाकार पुरुषोत्तम शिंदे उपस्थित होते. बैठकीदरम्यान नरेंद्र मेहता यांनी नगररचना विभागाला पत्र सादर करून वादग्रस्त जमिनीचा ताबा सोडत असल्याचे तसेच या भूखंडासाठी मिळालेली बांधकाम परवानगी परत करत असल्याचे कळवले. संबंधित जमीन आपण 2019 मध्ये मर्विन फर्नांडिस यांच्याकडून खरेदी केल्याचेही मेहता यांनी पत्रात नमूद केले आहे.
याशिवाय पोलीस आयुक्तांना स्वतंत्र पत्र देत मेहता यांनी वोरा यांच्याविरोधात यापूर्वी केलेली तक्रार मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. दोन्ही बाजूंमध्ये समझोता झाल्यामुळे तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडल्यानंतर काही दिवसांतच वादग्रस्त जमिनीचा ताबा सोडण्याची आणि बांधकाम परवानगी परत करण्याची भूमिका मेहता यांनी घेतल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.