मल्लिकार्जुन खर्गेंच्या ‘मोदी का बाप भी जायेगा’ वक्तव्यावरून वाद पेटला, भाजप आक्रमक, देशव्यापी आंदोलनाची घोषणा
सोमवारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यालयांवर भाजपकडून जोरदार निदर्शनं करण्यात येणार असल्याचं पक्षाने स्पष्ट केलं आहे.
BJP’s call for nationwide agitation : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतच्या वक्तव्यावरून देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. खर्गे यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. सोमवारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यालयांवर भाजपकडून जोरदार निदर्शनं करण्यात येणार असल्याचं पक्षाने स्पष्ट केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी खर्गे यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
बिहारचे पहिले मुख्यमंत्री श्रीकृष्ण सिंह यांच्या 139 व्या जयंतीनिमित्त रविवारी आयोजित कार्यक्रमात मल्लिकार्जुन खर्गे बोलत होते. यावेळी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेवरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला. या प्रक्रियेत कथित अनियमितता होत असल्याचा आरोप करत, मतांची चोरी होत असल्याचा दावाही खर्गे यांनी केला. याचदरम्यान, सभेतील एका व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत टिप्पणी केली. त्यावर प्रत्युत्तर देताना खर्गे यांनी, मोदी का बाप भी जायेगा, असं वक्तव्य केल्याचं वृत्त आहे. या विधानानंतर राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला.
खर्गे यांच्या वक्तव्यावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत वडिलांबाबत अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप भाजपने केला आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ सोमवारी देशभरातील सर्व राज्यांच्या मुख्यालयांवर जोरदार आंदोलन करण्यात येणार असल्याचं भाजपने जाहीर केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी खर्गे यांच्या भाषेवर टीका केली आहे. राजकीय मतभेद असले तरी सार्वजनिक जीवनात भाषेची मर्यादा पाळली पाहिजे, अशी भूमिका भाजप नेत्यांनी मांडली आहे.
महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट, बंगालच्या उपसागरात मोठ्या घडामोडी, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत बरसणार पाऊस
दरम्यान, काँग्रेसकडून या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. खर्गे भाषण करत असताना सभेतील एका व्यक्तीने त्यांच्या दिवंगत वडिलांचा अपमान केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर खर्गे यांनी प्रतिक्रिया दिल्याचं पक्षाचं म्हणणं आहे. काँग्रेसने असा आरोपही केला की, खर्गे यांच्या वक्तव्याचा संदर्भ चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे. या घटनेदरम्यान घोषणाबाजी करणाऱ्या आणि खर्गे यांच्या वक्तव्याला कारणीभूत ठरल्याचं सांगितल्या जाणाऱ्या व्यक्तीची काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचीही माहिती समोर आली आहे.
संबंधित व्यक्तीने आपली ओळख संतोष कुमार अशी सांगितली असून, आपण छपरा येथील काँग्रेस कार्यकर्ता असल्याचा दावा केला आहे. पत्रकारांशी बोलताना संतोष कुमार यांनी स्पष्टीकरण दिलं. देशात बंडखोरी होत नाही, तोपर्यंत नरेंद्र मोदी कुठेही जाणार नाहीत, असं आपल्याला म्हणायचं होतं. मात्र, आपल्या वक्तव्याचा अर्धाच भाग ऐकण्यात आल्यामुळे गैरसमज झाल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनीही खर्गे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.पंतप्रधानांच्या वडिलांबाबत करण्यात आलेलं वक्तव्य दुर्दैवी असून, काँग्रेसने याबद्दल माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी या भाषेबद्दल माफी मागावी, असंही चौधरी यांनी म्हटलं आहे. एकीकडे भाजपने देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसने या वक्तव्यामागील संदर्भ स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे खर्गे यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेला हा वाद आता रस्त्यावरच्या आंदोलनापासून ते राष्ट्रीय राजकारणापर्यंत पोहोचण्याची चिन्हं आहेत.
आता भाजपच्या देशव्यापी आंदोलनाला काँग्रेसकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं आणि या राजकीय संघर्षाला पुढे कोणतं वळण मिळतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.