जरांगे पाटलांचा सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम; मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर करणार

कुणबी नोंदीच्या आधारे मिळणारे आरक्षणच टिकणारे आणि पक्के असल्याचा दावा करत जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला.

News Photo   2026 08 29T194825.165

जरांगे पाटलांचा सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम; मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर करणार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Patil) यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची धार तीव्र केली आहे. अंतरवाली सराटी येथे आजपासून त्यांच्या उपोषणाला सुरुवात झाली असून, सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढावा, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यापूर्वी 29 ऑगस्टपासून उपोषण करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला होता. आता सरकारला त्यांनी थेट 15 दिवसांची मुदत दिली आहे

सरकारने या कालावधीत मागण्यांवर निर्णय घेतला नाही, तर 12 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे महाराष्ट्रभरातील मराठा बांधवांना एकत्र बोलावून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, अशी घोषणा जरांगे पाटील यांनी केली. याच दिवशी मुंबईतील आंदोलनाची तारीखही जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत आंदोलन सुरू झाल्यानंतर परिस्थिती वेगळी असेल, असा इशारा देत, यावेळी मराठ्यांना मुंबईतून परत आणणे आपल्याला शक्य होणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

सरकारवर भरोसा नाही, आपला पक्ष अन् नेता कोणीही नाही; जरांगे पाटील स्पष्टच बोलले

मराठा समाजाचे आंदोलन शांततेच्या मार्गाने असले तरी त्याची तीव्रता सरकारला जाणवली पाहिजे, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली. सरकारने अंतरवाली सराटीतील आंदोलनाची ताकद कमी करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मराठा समाजाची उपस्थिती लपणार नाही, असे ते म्हणाले. मुंबईतील आंदोलनामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना मराठा समाजाने आधीच सरकारला वेळ देऊनही प्रश्न न सुटल्याने हा मार्ग स्वीकारला आहे, असे वाटले पाहिजे, तसेच आंदोलनामुळे समाजाची बदनामी किंवा नुकसान होणार नाही याची जबाबदारी प्रत्येक मराठा बांधवाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

कुणबी नोंदीच्या आधारे मिळणारे आरक्षणच टिकणारे आणि पक्के असल्याचा दावा करत जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, सध्या अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू ठेवत सरकारला 15 दिवसांची संधी देण्यात आली आहे. या मुदतीत सरकार कोणता तोडगा काढते आणि 12 सप्टेंबरला जरांगे पाटील पुढील आंदोलनाची कोणती दिशा जाहीर करतात, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version