रेल्वे मार्गाला विरोध, राम शिंदेंना प्रत्युत्तर आणि शरद पवारांबाबतही भाष्य; प्राजक्त तनपुरेंकडून अनेक राजकीय संकेत

भाजप आमदार प्राजक्त तनपुरे यांनी रेल्वे मार्गाला स्पष्ट विरोध दर्शविताना सध्या या प्रकल्पाची कोणतीही आवशक्यता नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

Untitled Design (41)

Untitled Design (41)

Many political signals from Prajakt Tanpure : अहिल्यानगर जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या राहुरी-शनी शिंगणापूर रेल्वे मार्गाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजप आमदार प्राजक्त तनपुरे यांनी या रेल्वे मार्गाला स्पष्ट विरोध दर्शविताना सध्या या प्रकल्पाची कोणतीही आवशक्यता नसल्याचे मत व्यक्त केले आहे. या संदर्भात बोलताना आमदार तनपुरे म्हणाले की, त्यांनी नुकतीच पालकमंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली आहे. राहुरी ते शनी शिंगणापूर हे अंतर फारसे लांब नसल्याने भाविकांना प्रवासासाठी कोणतीही अडचण येत नाही. सध्या उपलब्ध असलेला रस्ता देखील चांगल्या स्थितीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

तनपुरे यांनी सांगितले की, प्रस्तावित रेल्वे मार्ग ज्या परिसरातून जाणार आहे तो भाग प्रामुख्याने बागायती शेतीचा आहे. अनेक शेतकरी या जमिनींवर अवलंबून असून रेल्वे प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर शेती जमीन संपादित करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे निक्सन होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी सरकारच्या निधीच्या वापराबाबत देखील प्रश्न उपस्थित केला. ज्या प्रकल्पाची प्रत्यक्ष गरज नाही, त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्याऐवजी विद्यमान राहुरी रेल्वे स्थानकावर आणखी पाच ते सहा रेल्वे गाड्यांना थांबा देण्याचा विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.

या रेल्वे मार्गाची आवश्यकता नसल्याची भावना मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पालकमंत्र्यांमार्फत निवेदन देण्यात यावे, अशी देखील भूमिका त्यांनी स्पष्ट केली. दरम्यान, बहुप्रतीक्षित नगर-मनमाड महामार्गाच्या कामाबाबत देखील तनपुरे यांनी भाष्य केले. हा विषय राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांच्या कार्यक्षेत्राशी संबंधित असल्याचे सांगत सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकल्पातील अडचणी दूर करून कामाला गती देण्यासाठी समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.

सलग सात वेळा दरवाढीनंतर अखेर दिलासा; व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत मोठी घट

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत विधानसभेच्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं देखील तनपुरे यांनी स्पष्ट केलं. अद्याप सभागृहात आपल्याला अपेक्षित संधी मिळालेली नसल्याचे सांगत, संधी मिळताच शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर स्थानिक मुद्दे सभागृहात मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या वक्तव्यावर देखील प्रतिक्रिया दिली. तनपुरे भाजपमध्ये अस्वस्थ असल्याचे त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून जाणवत असल्याचे वक्तव्य राम शिंदे यांनी केले होते. त्यावर उत्तर देताना तनपुरे म्हणाले की, आमदारांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमातून ते प्रकृती अस्वथामुळे लवकर निघून गेले होते. त्याचा कोणताही राजकीय अर्थ काढण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच सभापती महोदय आमच्या जिल्ह्यातील आहेत. त्यांनी आम्हा आमदारांना सभागृहात प्रश्न मांडण्यासाठी अधिक वेळ दिला तर कोणताही गैरसमज किंवा ऑकवर्डनेस राहणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. राजकीय चर्चेत असलेल्या कौटुंबिक आणि राजकीय संबंधांच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. राम शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत, मामा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि आपण भाजपमध्ये असल्यामुळे विखे पाटील यांनी पुढाकार घ्यावा, असे सांगण्यात आले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना तनपुरे म्हणाले की, नातेसंबंध आणि राजकारण या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत.

बालकांना गुन्ह्यांसाठी प्रवृत्त करणाऱ्यांना मकोकाचा फास; विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

मामा मुंबईत असतात. त्यांच्या घरी मी अधूनमधून जात असतो. मात्र त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत सल्ला देण्याइतका मी मोठा कार्यकर्ता नाही. त्यांचा राजकीय अनुभव आणि वजन खूप मोठे आहे. त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यायचा हे तेच ठरवतील, असे ते म्हणाले. मात्र, ते आमच्याकडे आले तर मला देखील आनंदच होईल, असे मिश्किल वक्तव्यही त्यांनी केले.

याशिवाय, निवडून आल्यानंतर आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राहुरी-शनी शिंगणापूर रेल्वे मार्ग, नगर-मनमाड महामार्ग, शेतकरी प्रश्न तसेच स्थानिक राजकारण या सर्व मुद्द्यांवर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Exit mobile version