बीड : हिंसाचाराच्या प्रकरणात जे खरे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई करा. यात विनाकारण राजकारण होत असून आंदोलन करणाऱ्या गरीब पोरांना या प्रकरणात गुंतवले जात आहे. सरकारने दोन दिवसांमध्ये अशा कारवाया थांबवाव्यात, अन्यथा बीडमधील (Beed) समाज रस्त्यावर उतरणार आहे, असा इशारा मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी शिंदे सरकारला दिला आहे. ते अंतरवाली सराटी गावातून माध्यमांशी बोलत होते. (Maratha reservation activist Manoj Jarange Patil has warned the Shinde government on Beed incident)
काही दिवसांपूर्वी घडलेल्या जाळपोळींच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ऐन दिवाळीत पोलिसांनी तब्बल 181 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. मनोज जरांगे यांचं दुसरं उपोषण सुरू असताना बीड जिल्ह्यांत राजकीय नेत्यांची घरं अज्ञातांकडून जाळण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनेनंतर राज्यातून मोठी टीका झाली होती. दरम्यान, पोलिसांनी आणखी 200 जणांची ओळख पटविल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मनोज जरांगे यांनी शिंदे सरकारला या कारवाया थांबवाव्यात अन्यथा रस्त्यावर उतरु असा इशारा दिला आहे.
माझी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना बीडमधील प्रकरणात लक्ष घालावे अशी विनंती करतो.बीडमधील हिंसाचाराच्या प्रकरणात जे खरे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई करा. यात विनाकारण राजकारण होत असून आंदोलन करणाऱ्या गरीब पोरांना या प्रकरणात गुंतवले जात आहे. सरकारने दोन दिवसांमध्ये अशा कारवाया थांबवाव्यात, अन्यथा बीडमधील समाज रस्त्यावर उतरणार आहे. शिवाय बुधवारी नाईलाजाने संबंधित अधिकाऱ्यांची नावे जाहीर करणार आहे. परत तुमच्याच अधिकाऱ्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्था भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, अशीही विनंती जरांगे पाटील यांनी केली.
मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांचं दुसरं उपोषण सुरू असताना 30 आणि 31 ऑक्टोबरला बीडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. त्यामध्ये राष्ट्रवादी भवन, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, बीआरएसचे दिलीप गोरे यांची बीडमध्ये कार्यालये आणि राहती घरं पेटवून देण्यात आली होती.
तर दुसरीकडे माजलगाव येथे नगरपालिकेसह आमदार प्रकाश सोळुंके, संदीप क्षीरसागर यांच्या राहत्या घरांना आग लावण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांकडून 307 कलमांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार आरोपींची ओळख पटवून आतापर्यंत 181 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.