Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. मराठा आरक्षणासाठी स्थगित केलेले आमरण उपोषण येत्या २५ जानेवारीपासून पुन्हा सुरू करणार आहोत, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. सरकारने कुठेही कुणबी नोंद सापडली तरी त्या व्यक्तीला त्याच्या तालुका ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. यासाठी अंतरवाली सराटीमध्ये 25 जानेवारीला उपोषण सुरू करणार. 25 जानेवारीपूर्वी मागण्या मान्य करा. अन्यथा सरकार पश्चात्ताप करेल. 25 जानेवारीला राज्यातील मराठा समाजाने अंतरवाली सराटीमध्ये यायचं आहे. मराठा समाजाने पुन्हा आपली शक्ती दाखवायची आहे,” असं आवाहन जरांगेंनी केलंय.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आता सामूहिक उपोषण होणार आहे. उपोषणाला बसा असं कुणावरही बंधन नाही. येथे येऊन फक्त बसलं तरी चालतंय. ज्यांची इच्छा आहे ते उपोषणाला अंतरवाली सराटीत बसू शकतात. उपोषणाला जरी कुणीही बसलं नाही तरी मी एकटाच बसणार आहे. येत्या २५ तारखेच्या आत सरकारने आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अन्यथा स्थगित केलेलं उपोषण पुन्हा एकदा सुरू करणार आहोत, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
राज्य सरकारने शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी. कुणबी प्रमाणपत्रांच्या वितरणाचं काम बंद पडलं आहे ते तातडीने सुरू करावं. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 16 महिन्यांपासून आमचा लढा सुरू आहे. प्रत्येक मराठा समाजाच्या लेकराचं हित आरक्षणात आहे मात्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही म्हणून आम्ही सामूहिक आमरण उपोषण करणार आहोत. सरकारला आमची विनंती आहे की,आमच्या मागण्या तातडीने मान्य करा. राज्यातील सगळ्या मराठा समाजाला कुणबी आरक्षणाचा कायदा या अधिवेशनात करावा, हैदराबाद, सातारा बॉम्बे गॅझेट लागू करावे, सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, 2004 च्या कायद्यात सुधारणा करावी, अशा काही मागण्या जरांगे यांनी यावेळी केल्या.
मी काय खेळणं आहे का तुमच्या हातातलं?; खडेबोल सुनावतं नाराज भुजबळ कडाडले…
ज्यांना उपोषणात बसायचं ते बसू शकतात ज्यांना उपोषण सहन होत नाही त्यांनी उपोषणात न बसता उपोषणाला पाठिंबा द्यावा. राज्यातील कुणीही उपोषणात बसू शकतो इतर ठिकाणी उपोषण न करता अंतरवालीत उपोषणाला बसावं. मराठा कुणबी एकच असल्याचा अध्यादेश सरकारने पारित करावा. मराठा आंदोलकांवरील सरसकट केसेस मागे घ्याव्यात. शिंदे समिती काम करत नाही नोंदी शोधत नाही, या समितीला कुणबी नोंदी शोधण्याचे आदेश द्यावेत. शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ देऊन या समितीत मनुष्यबळ वाढवावं. मराठा समाजासाठी कुणबी, EWS हे पर्याय खुले ठेवावेत.
माझं गाव माझी जबाबदारी ही मोहीम मराठ्यांनी हाती घ्यावी. गावागावात सामूहिक उपोषणासाठी बैठका घ्याव्या. पत्रिका छापून एकमेकांना या सामूहिक उपोषणात येण्यासाठी निमंत्रण द्यावे. 25 तारखेला कुणाचीही लग्नाची तारीख पकडू नये तारीख निश्चित केली असेल तर रद्द करा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी समाजबांधवांना केलं.
26 जानेवारी रोजी राज्य सरकारने आमचा सगेसोयरे अध्यादेश काढून एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे 25 जानेवारी रोजी सामूहिक उपोषण सुरू करत आहोत. सामूहिक उपोषणात येताना मुंबईला जाण्यासारखी तयारी करून या. सगळं साहित्य सोबत आणा, खाण्यापिण्याचे सगळे साहित्य सोबत घेऊन या. घरच्यांच्याविरोधात जाऊन आमरण उपोषण करू नका. या उपोषणात माझा शेवट देखील होऊ शकतो. माझं शरीर आता साथ देत नाही. मला फार त्रास होतो. मला काही झालं तर समाजासाठी योगदान द्या, लढा बंद पडू देऊ नका. माझं काहीही होऊ द्या पण मी कधीही मॅनेज होणार नाही असा शब्द त्यांनी यावेळी दिला.