Download App

3 ऑक्टोबर रोजी दरवर्षी साजरा होणार अभिजात मराठी भाषा सन्मान दिन, उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा

Maharashtra Budget 2025 : महाराष्ट्रासाठी2025-26  साठी अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा करत दरवर्षी

  • Written By: Last Updated:

Maharashtra Budget 2025 : महाराष्ट्रासाठी2025-26  साठी अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठी घोषणा करत दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच 3 ते 9 ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी दिली.

यावेळी अजित पवार म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 3 ऑक्टोबर, 2024 रोजी झालेल्या बैठकीत अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यातील जनतेच्या आणि जगभरातील मराठी भाष‍िकांच्यावतीने मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी महोदयांचे मन:पूर्वक आभार मानतो. यापुढे दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन, तर 3 ते 9 ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येईल असं अजित पवार म्हणाले.

याच बरोबर मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर येथे अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र तसेच अनुवाद अकादमी स्थापित करण्यात येणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषाविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मराठी भाषेच्या संशोधनातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार सुरु करण्यात येणार आहेत. असेही अजित पवार म्हणाले.

गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करणार 

तर दुसरीकडे “सर्वांसाठी घरे” हे उद्दीष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी अजित पवार यांनी दिली.

राज्यात प्रधानमंत्री आवास योजना, पीएम जनमन या केंद्र पुरस्कृत तर रमाई आवास, शबरी आवास, आदिम आवास, पारधी आवास, अटल बांधकाम कामगार वसाहत, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास, मोदी आवास तसेच धर्मवीर आनंद दिघे घरकुल या योजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत आतापर्यंत एकूण 44 लाख 7 हजार घरकुल मंजूर करण्यात आली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

मोठी बातमी! राज्यात येत्या पाच वर्षात 237 किमीचे मेट्रो मार्ग सुरु होणार, अजित पवारांची घोषणा

तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा – 2 अंतर्गत सन 2024 -25 करिता 20 लाख घरकुलांच्या उद्दीष्टापैकी सुमारे 18 लाख 38 हजार घरकुलांना मंजुरी दिली असून 14 लाख 71 हजार लाभार्थींना पहिल्या हप्त्यासाठी 2 हजार 200 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. ही योजना राबविण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य शासनाकडून या योजनेच्या अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. या सर्व घरकुलांच्या छतावर सौर उर्जा संच बसविण्यात येणार आहेत. असं देखील अजित पवार म्हणाले.

follow us