रिक्षाचालकांसाठी ‘मराठी’ अनिवार्य; 1 मे पासून नियम लागू, अन्यथा परवाना होणार रद्द!

Auto Drivers महाराष्ट्रात रिक्षा चालवण्यासाठी मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली.

रिक्षाचालकांसाठी 'मराठी' अनिवार्य; 1 मे पासून नियम लागू, अन्यथा परवाना होणार रद्द!

रिक्षाचालकांसाठी 'मराठी' अनिवार्य; 1 मे पासून नियम लागू, अन्यथा परवाना होणार रद्द!

Marathi Mandatory For Auto And Taxi Drivers : संपूर्ण महाराष्ट्रात रिक्षा चालवण्यासाठी मराठी भाषा येणे बंधनकारक करण्यात आले आहे. १ मे २०२६ पासून या नियमाची कडक अंमलबजावणी होणार असून, मराठी न येणाऱ्या चालकांचा परवाना थेट रद्द केला जाणार आहे अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. हा निर्णय केवळ मीरा-भाईंदरपुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी लागू असेल. १ मे पर्यंत सर्व रिक्षाचालकांची तपासणी केली जाईल. ज्यांना मराठी बोलता किंवा समजता येत नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांचा वाहन परवाना (License) रद्द केला जाईल असे सरनाईक यांनी सांगितले.

बाईक टॅक्सीवर बंदी आणि ॲप्सना दणका

बेकायदेशीरपणे चालणाऱ्या बाईक टॅक्सी सेवांवर सरकारने कडक भूमिका घेतली आहे. ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) यांच्या परवान्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या कंपन्यांच्या सेवांवर आता प्रशासनाची करडी नजर असणार आहे असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.

मेट्रो-१० प्रकल्पाला वेग 

ठाणे-मीरा भाईंदर परिसरातील प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे. ९.७ किमी अंतराच्या या उन्नत मेट्रो प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होत आहे. गायमुख (रेतीबंदर) ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (घोडबंदर) असा हा मार्ग असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार या कामाला वेग देण्यात आला आहे. ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर शहरात ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्प राबवण्याचा सरकारचा मानस आहे. पीपीपी तत्त्वावर चालणाऱ्या या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल (DPR) पुढील सहा महिन्यांत पूर्ण केला जाईल. पावसाळ्यापूर्वी घोडबंदर रोडच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याचेही सरनाईक म्हणाले. महावितरणच्या कामांसाठी ७५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, पुढील ३ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ठाणे-मीरा भाईंदरचा कायापालट होणार

ठाणे आणि मीरा भाईंदरमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारने मेट्रो-१० (दहिसर-काशीगाव ते गायमुख) विस्ताराला हिरवा कंदील दाखवला आहे. सुमारे ८,५५३ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम पुढील ३-४ महिन्यांत सुरू होईल आणि २०२९ पर्यंत हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट आहे.

यासोबतच, घोडबंदर रोडवरील कोंडी कमी करण्यासाठी ५.५ ते ६ किमी लांबीच्या रस्त्याचे ३० मीटरवरून ६० मीटरपर्यंत रुंदीकरण केले जाणार आहे. १,२०० कोटी रुपयांच्या या काँक्रीट रस्ते प्रकल्पात बाधित होणाऱ्या आदिवासी जमिनींसाठी शासकीय दराने भरपाई दिली जाईल, तर विकासकांना टीडीआर (TDR) आणि एफएसआय (FSI) च्या माध्यमातून सवलती देऊन हा मार्ग मोकळा केला जाणार आहे.

 

Exit mobile version