परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेणार नाही; राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश, जशास तसे उत्तर देण्याची भूमिका
परिवहन विभागाशी संबंधित बैठकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आमंत्रण देण्यात आले नसल्याने, सरकार निर्णय मागे घेण्याचा प्रयत्न करत आहे का?
Raj Thackeray’s orders to his workers : महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी अस्मिता, परप्रांतीयांचा प्रश्न आणि परिवहन धोरण या मुद्द्यांमुळे वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला थेट इशारा दिला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, अध्यक्ष राज ठाकरे आन अमित ठाकरे यांची कार्यकर्त्याला कौतुकाची थाप पडली की तो दुप्पट जोमाने काम करतो. यावेळी त्यांनी सरकारवर देखील गंभीर शंका उपस्थित केली. परिवहन विभागाशी संबंधित महत्वाच्या बैठकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आमंत्रण देण्यात आले नसल्याने, सरकार निर्णय मागे घेण्याचा प्रयत्न करत आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ज्याअर्थी आम्हला बैठकीला बोलावलं नाही, त्याअर्थी निर्णय ग्नेण्याची प्रक्रिया सुरू झाली असावी, असे म्हणत त्यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयावर ठाम राहावे अशी मागणी केली. तसेच मराठी भाषेच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेत, मराठी शिकण्यासाठी किती वेळ हवा, ती तारीख आजच जाहीर करा, असा इशारा देखील त्यांनी दिला. मराठीचा मुद्दा मनसेच पुढे नेणार, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
याचबरोबर, देशपांडे यांनी काही नेत्यांवर वादग्रस्त टीका देखील केली. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या संदर्भात बोलताना त्यांनी सूचक विधान करत शिंदे गटावर निशाणा साधला, तर संजय निरुपम यांच्यावर देखील कठोर शब्दांत टीका केली. तसेच धीरेंद्र शास्त्री उर्फ वाघेश्वर बाबांच्या बाबतीत देखील त्यांनी अत्यंत आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्य केले.
बच्चू कडूंच्या उमेदवारीवर मोठा पेच; शिवसेनेशी संबंध काय? असा सवाल, प्रहार जनशक्ती पक्ष विलीन करण्याची अट?
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पक्षाची भूमिका स्पष्ट करत कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले. परप्रातीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, त्यांना जशास तसे उत्तर द्या, असा स्पष्ट इशारा देखील त्यांनी दिला. मराठी रिक्षाचालकांच्या पाठीशी मनसे ठामपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले. परिवहन विभागाच्या निर्णयावर मनसेचे बारकाईने लक्ष असल्याचे सांगत, परप्रांतीय रिक्षाचालकांच्या आंदोलनाच्या आम्ही विरोधात आहोत. गरज पडल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिला आहे. तसेच संजय निरूपम यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या मनसे पदाधिकारु आणि कार्यकर्त्यांचा सन्मान देखील करण्यात आला.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या परिवहन विभाग आणि रिक्षा संघटनेच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. येणाऱ्या १ मे अर्थातच महाराष्ट्र दिनापर्यंत परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं की, कुणाच्या रोजी-रोटीवर पाय येता कामा नये. सरकारला कोणाच्याही पोटावर पाय आणायचा नाही. परंतु आम्ही महाराष्ट्रात व्यवसाय करू, मात्र हिंदीतच बोलू, अशी त्यांची भूमिका असेल तर हे चालणार नाही.
साहित्य परिषदेनेही त्यांच्या ऑफिसेसमध्ये मराठीचे वर्ग घेण्याची तयारी दाखवली. त्यांचे आभार आहेत, असंही प्रताप सरनाईकांनी सांगितले. विविध संघटनांनी मुदतवाढ मागितली आहे. त्यावर चर्चा करून मुदत द्यायची की नाही ते ठरवू, मुदत देऊ, पण मुजोरी चालणार नाही, असं प्रताप सरनाईकांनी सांगितले.