दुष्काळाच्या झळांचा पाऊस! मराठवाड्यात पाणीसाठ्याची चिंता वाढली, अनेक धरणांची स्थिती गंभीर

मराठवाड्यात कमी पावसामुळे मोठ्या धरणांमध्ये एकदम कमी पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाणीटंचाईची चिंता वाढली आहे.

News Photo   2026 10 20T172645.967

Marathwada Water Crisis

मराठवाड्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने (Marathwada) धरणांतील पाणीसाठा घटू लागला आहे. मोठ्या धरणांमध्ये सरासरी ६० टक्के पाणी शिल्लक असताना मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये केवळ १७ टक्के जलसाठा उरला आहे. कमी पावसामुळे जलाशयांमध्ये अपेक्षित पाणी जमा झाले नाही आणि उपलब्ध साठ्यातून पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पाणी वापरले जात आहे. त्यामुळे आगामी काळात मराठवाड्यातील पाणीटंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील ११ मोठ्या धरणांमध्ये पाणीसाठ्याची स्थिती संमिश्र आहे. पैठणच्या जायकवाडी धरणात ७५ टक्के, विष्णुपुरीत ७६ टक्के, ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पात ६८ टक्के, येलदरीत ६० टक्के आणि निम्न मनार प्रकल्पात ५८ टक्के पाणी शिल्लक आहे. जायकवाडी धरणावर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन अवलंबून असल्याने या प्रकल्पातील जलसाठ्याला विशेष महत्त्व आहे. मात्र, सर्वच धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याचे चित्र नाही.

दुष्काळी मदतीचे 5 हजार मिळणार, पण नमो शेतकरी योजनेचे 4 हजार कधी येणार?

काही मोठ्या धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. लातूरसह परिसरातील पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मांजरा धरणात केवळ ९ टक्के पाणी शिल्लक आहे. निम्न दुधना प्रकल्पात १६ टक्के, माजलगाव धरणात २३ टक्के, सिद्धेश्वर धरणात २९ टक्के आणि निम्न तेरणा प्रकल्पात २० टक्के जलसाठा उरला आहे. पावसाअभावी या प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणी जमा न झाल्याने उपलब्ध साठ्यावर अवलंबून असलेल्या भागांमध्ये पाणी नियोजनाचे आव्हान वाढले आहे.

मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये अवघा १७ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने ग्रामीण भागातील पाणीपुरवठा आणि शेतीच्या सिंचनाची चिंता वाढली आहे. उन्हाळ्यापूर्वीच पाण्याची उपलब्धता कमी होत असल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देताना शेतीसाठी पाणी देण्याचे नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे. संभाव्य टंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे, तसेच पाणीवाटपाचे योग्य नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे.

Exit mobile version