मराठवाडा पदवीधर आणि सतीश चव्हाण हे समीकरण कसं झालं?, राजकीय साथीदार बदलले तरी चौथ्यांदा विजयाचा विश्वास कसा?
Marathwada Graduates Election 2026 : सलग तीन विजय मिळाल्यानंतर सतीश चव्हाण हे मराठावाडा पदवीधरमध्ये चौथ्यांदा मैदानात आहेत.
Marathwada Graduates Election 2026 : मराठवाड्यातील पदवीधर मतदारसंघाचा इतिहास हा अनेक राजकीय बदलांचा साक्षीदार आहे. 1978 मध्ये धुळे, जळगाव, नाशिक आणि मराठवाडा या भागांचा समावेश असलेल्या संयुक्त पदवीधर मतदारसंघातून दोन सदस्य निवडून येत होते. त्यानंतर 1984 मध्ये मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांसाठी स्वतंत्र पदवीधर मतदारसंघ तयार झाला. या बदलामुळे मराठवाड्यातील पदवीधरांना विधान परिषदेवर स्वतंत्र प्रतिनिधित्व मिळण्याचा मार्ग खुला झाला.
2008 ची निवडणूक या मतदारसंघाच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरली. भाजपचे श्रीकांत जोशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश भानुदास चव्हाण यांच्यात लढत झाली. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीनंतर सतीश चव्हाण यांनी 3,453 मतांच्या फरकाने विजय मिळवला. याच निवडणुकीपासून चव्हाण यांचा पदवीधर मतदारसंघातील आमदारकीचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर 2014 मध्येही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या रूपात विजय मिळवला.
‘पीएचडी म्हणजे नोकरीची हमी नाही’, कौशल्याधारित शिक्षणावर भर देत सतीश चव्हाणांचा तरुणांना सल्ला
पुढं 2020 मध्येही सतीश चव्हाण यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून आपली राजकीय पकड कायम असल्याचं दाखवलं. त्या निवडणुकीत त्यांना 1,16,638 मतं मिळाली, तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना 58,743 मतं मिळाली. चव्हाण यांचा विजयाचा फरक 57,895 मतांचा होता. या निवडणुकीत एकूण 35 उमेदवार रिंगणात होते आणि 3,73,166 नोंदणीकृत मतदारांपैकी 2,41,908 मतं पडली. हे आकडे या निवडणुकीतील चव्हाण यांच्या विजयाचं प्रमाण दाखवतात.
सतीश चव्हाण यांच्या राजकीय प्रवासासोबतच शिक्षण क्षेत्रातील कामाचाही उल्लेख महत्त्वाचा आहे. ते मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आहेत. या संस्थेची स्थापना 1959 मध्ये झाली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवणं, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध करून देणं ही संस्थेची उद्दिष्टं आहेत. तसंच, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक मार्गदर्शन, संपर्क-संधी आणि करिअरविषयक मदत मिळावी यावर भर दिला जातो.
ग्रामीण आणि सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी मिळाव्यात, हा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कामाचा महत्त्वाचा भाग आहे. सतीश चव्हाण या संस्थेच्या सचिवपदावरून शैक्षणिक कामकाजाशी जोडलेले आहेत. त्यामुळे त्यांची सार्वजनिक ओळख केवळ निवडणुकीपुरती मर्यादित राहत नाही; शिक्षणसंस्थांचं व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांशीही त्यांचा संबंध आहे.
आता सलग चौथ्यांदा सतीश चव्हाण मैदानात आहेत. यावेळी राजकीय समिकरण बदलले आहेत. आजपर्यंत ज्यांना विरोध केला ते सोबत आहेत आणि ज्यांच्यासोबत प्रवास केला ते विरोधात आहेत. ज्यांच्या एका फोनवर निवडणुकीच्या राजकारणाचा शुभारंभ झाला ते पक्षाचे सर्वोच्च नेते अजित पवार गेल्याने चव्हाण यांना आपलं छत्र हरपल्याची भावना आहे. तसंच, पक्ष तोच असला तरी सहकाही ते नाहीत. परंतु, यावेळीही आपल्या संघटन कौशल्यावर, जनसंपर्कावर, विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीवर त्यांना आपण नक्की विजयी होणार असल्याचाच विश्वास वाटतो. मराठावाडा शिक्षण प्रसारक मंडळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशा संस्था त्यांच्यासाठी कायम महत्वाच्या राहिल्या आहेत. त्यामधील कामाच्या जोरावरच आज चव्हाण यांना विजयाची खात्री वाटत आहे.
निवडणुकीचं सध्याचं चित्र काय?
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून, आता प्रत्यक्ष लढतीचं चित्र स्पष्ट झालं आहे. एकूण 54 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 13 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 41 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळं या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडं संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष लागलं आहे.
या निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार सतीश चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, भाजपचे एम. के. देशमुख यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीसमोर पेच निर्माण झाला होता. देशमुख यांनी मैत्रीपूर्ण लढतीची मागणी भाजप नेत्यांकडे केली होती. मात्र, त्यात यश न आल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तासात माघार घेतली. त्यामुळे आता महायुतीकडून सतीश चव्हाण हेच प्रमुख उमेदवार असतील.
आघाडीत बिघाडी कायम
दुसरीकडे, महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद मात्र दूर होऊ शकले नाहीत. या मतदारसंघाची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाल्याचं सांगत दिलीप घुगे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यांनी निवडणुकीसाठी अर्जही दाखल केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून डॉ. प्रतापसिंह पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी माघार न घेतल्याने आता दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात कायम आहेत. त्यामुळं महायुतीतील उमेदवारीचा प्रश्न सुटला असला, तरी महाविकास आघाडीतील एकमताचा अभाव या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. आता सतीश चव्हाण, दिलीप घुगे आणि डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.
मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी मतदार किती?
आता या निवडणुकीच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये एकूण 3 लाख 26 हजार 701 पदवीधर मतदार आहेत. यामध्ये 2 लाख 48 हजार 971 पुरुष मतदार, 77 हजार 717 महिला मतदार आणि 13 इतर मतदारांचा समावेश आहे.