मोठी बातमी : शरद पवारांशी जवळीक भोवली; अजितदादांकडून आमदार सतीश चव्हाणांची हकालपट्टी
मुंबई : आमदार सतीश चव्हाण यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे. जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आणि पक्षशिस्त मोडल्याबद्दल आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे. चव्हाण आज (दि.18) दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे दाखल झाले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. (Ajit Pawar NCP suspends MLC Satish Chavan for 6 years for anti-party activities)
भाजपचा चिंचवडचा उमेदवार ठरला! आमदार अश्विनी जगतापांचा ‘या’ उमेदवाराला ग्रीन सिग्नल…
१५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारच्या विरोधात प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका छत्रपती संभाजीनगरचे आमदार सतीश चव्हाण यांनी घेतली होती. वास्तविक सर्व समाजघटकांना न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारच्या कार्यकाळात घेतलेली आहे. असे असताना आमदार सतीश चव्हाण यांनी जाणीवपूर्वक शिस्तभंग करण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सुनिल तटकरेंनी (Sunil Tatkare) म्हटले आहे.
“त्यांच्या त्रासामुळेच भाजप सोडतोय”; अजितदादांवर टीका करत माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
काय म्हणाले होते चव्हाण?
जवळपास दीड वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सहभागी झाला. तथापि, मराठा, ओबीसी, धनगर यांच्या आरक्षणासह बहुजनांचे प्रश्न हे सरकार सोडवू शकले नाही, असे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मंगळवारी (ता. १५) प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले होते. त्यांच्या या पत्रकाची दखल प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी घेत चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे.
Sharad Pawar : शरद पवारांनी रायगडमध्ये टाकला डाव; अदिती तटकरेंविरुद्ध उमेदवार सापडला?
जोरदार पक्षांतराच्या चर्चा
महायुतीमधून उमेदवारी मिळणे शक्य नसल्याने सतीश चव्हाण पक्षांतर करू शकतात, अशी चर्चा गेल्या दाेन महिन्यांपासून सुरू आहे. सतीश चव्हाण हे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार असून, ते गंगापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक आहेत. सध्या भाजपचे आमदार प्रशांत बंब हे या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. महायुतीवर आरक्षण प्रश्न न सोडवल्याची टीका चव्हाण यांनी केली होती. तसेच अलिकडेच त्यांनी आंतरवली सराटीमध्ये जाऊन आरक्षण आंदोलनकर्ते मनाेज जरांगे यांचीही भेट घेतली हाेती.